Indapur News : गणरायासमोर साकारला कृषी संस्कृतीचा देखावा
Indapur News : गणरायाच्या स्वागतासाठी यंदा त्यांच्या निवासस्थानी कृषी संस्कृती आणि महिला शेतकरी सक्षमीकरणाचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.

इंदापूर : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व त्यांच्या पत्नी सारिका भरणे यांच्या हस्ते गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी भरणे कुटुंबीय उपस्थित होते.
गणरायाच्या स्वागतासाठी यंदा त्यांच्या निवासस्थानी कृषी संस्कृती आणि महिला शेतकरी सक्षमीकरणाचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. विविध फळपिके, शेतीतील विविध पिकांची लागवड, कृषी उत्पादन तसेच महिला शेतकऱ्यांची बदलती भूमिका या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांच्या कष्ट, योगदान आणि सक्षमीकरणाचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.
गणरायाची आरती व पूजा केल्यानंतर कृषिमंत्री भरणे यांनी चांगला पाऊस, भरघोस पीक आणि बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, असे साकडे गणरायाला घातले. शेतकऱ्यांच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळावी, शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि राज्यातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.कृषी क्षेत्राच्या प्रगतीसोबत महिला शेतकऱ्यांचा सहभाग आणि सक्षमीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे. महिलांनी शेती, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये पुढाकार घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रमांना चालना दिली जात आहे,” असेही भरणे यांनी सांगितले.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सर्वत्र आनंद, समाधान आणि सामाजिक सलोखा नांदावा, अशी अपेक्षा आहे.
-दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.





