Shruti Haasan : मुंबईतील घरात घडत होती विचित्र घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
Shruti Haasan : नेहा धुपियाला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने हा अनुभव सांगितला. एखाद्या ठिकाणचे वातावरण सामान्य आहे की तिथे काहीतरी विचित्र आहे, याची जाणीव आपल्याला कधीकधी होते, असे तिने सांगितले.

Shruti Haasan : अभिनेत्री श्रुती हासन ही तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मुंबईतील घरात आलेल्या एका विचित्र आणि भीतीदायक अनुभव शेअर केला. तिच्या घरात काहीतरी अजब घडत असल्याची जाणीव तिला सतत होत होती. अनेक उपाय करूनही परिस्थितीत फरक पडत नसल्याचे तिने सांगितले.
नेहा धुपियाला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने हा अनुभव सांगितला. एखाद्या ठिकाणचे वातावरण सामान्य आहे की तिथे काहीतरी विचित्र आहे, याची जाणीव आपल्याला कधीकधी होते, असे तिने सांगितले. तिच्या चेन्नईतील घराचे वातावरण अतिशय शांत आहे. मात्र, मुंबईतील घरात राहायला सुरुवात केल्यापासूनच तिला तिथे काहीतरी विचित्र असल्याचे जाणवत होते.
रात्रीच्या वेळी जागा बदलायचा मॅनक्विन!
श्रुतीने सांगितले की, तिच्याकडे माणसाच्या आकाराचा एक मॅनक्विन होता. तिने त्याचे नाव ‘फिओना’ ठेवले होते. तिच्याकडे एक एस्ट्रा ड्रेस होता, जो कपाटात ठेवण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे तिने तो ड्रेस या मॅनक्विनला घातला होता. तिचे मित्र घरी आल्यावर नेहमी या फिओनाचे स्वागत करायचे.
मात्र, काही दिवसांनी तिला एक विचित्र गोष्ट जाणवू लागली. रात्रीच्या वेळी हा मॅनक्विन आपली जागा बदलत असायचा. सुरुवातीला हा प्रकार नेमका कसा घडतोय आणि मॅनक्विनला कोण हलवत आहे, असा प्रश्न तिला पडला. अखेर या सगळ्याला कंटाळून तिने तो मॅनक्विन तोडून घराबाहेर काढून टाकला.
हनुमान चालिसा म्हणत केले संपूर्ण घर सील!
घरातील विचित्र वातावरण दूर करण्यासाठी श्रुतीने अनेक उपाय केले. तिने हनुमान चालिसाचे पठण केले, हातात मीठ घेतले आणि संपूर्ण घर सील केले. या उपायानंतर घरातील वातावरण शांत झाल्याचे तिने सांगितले. आपल्या या अनुभवाची तुलना तिने ‘आय अॅम लीजेंड’ या चित्रपटाशीही केली. श्रुती हासनने सांगितलेल्या या अनुभवामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर या घटनेची चर्चा रंगली आहे.





