एका लग्नाची भलतीच गोष्ट! प्रेमविवाह केला तो पण ‘करारनामा’ करूनच

मंचर – विवाह सोहळा म्हटलं की दोन कुटुंब एकत्र येण्याचा सोहळा. आजकालच्या सोशल मीडिया व उच्च शिक्षित नवदाम्पत्य वेगवेगळ्या पद्धतीने आपला विवाह साजरा करतात. त्यातून ते अनेकदा सामाजिक संदेश देत असतात. अशाच प्रकारे आंबेगाव तालुक्यातील एका लग्नात नवरा-नवरीने एकमेकांसोबत करारनामा केला असून सध्या या करारनाम्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे.
शासकीय, महसूल यांसह विविध विभागात अनेक प्रकारे करारनामे केले जातात; मात्र लग्नात केलेला करारनामा ऐकलं की नवल वाटेल; मात्र असा करारनामा झाला आहे आंबेगाव तालुक्यातील एका विवाहात. गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील सुवर्णा संदीप शंकरराव लंबे यांचा मुलगा कृष्णा व नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सविता सुनील महादेव ताजणे यांची सुकन्या सायली यांचा प्रेमविवाह सोहळा 23 फेब्रुवारी रोजी एकलहरे (कळंब) येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात पार पडला.
यावेळी त्यांनी एक करारनामा बनवला या करारनाम्यात त्यांनी एकमेकांना लग्नानंतर आपण कसे वागणार, याबाबतचे प्रॉमिस (शब्द) दिले आहेत. तसेच या करार नाम्यावर साक्षीदार म्हणून त्यांच्या मित्र-मैत्रिणी यांच्या सह्यादेखील करण्यात आले आहे. हा करारनामा करून तो विवाह स्थळ ठिकाणी लावला होता. येणारे जाणारे पाहुणे, वऱ्हाडी मंडळी करारनामा पाहत त्यांचे कौतुक करत होते. हे नवदाम्पत्य उच्चशिक्षित असून त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. या करारनाम्यातून या नवरा, नवरिने एकमेकांच्या आई वडिलांना सांभाळण्याचा, वाद झाल्यास तो तात्काळ मिटवण्याचा, एकमेकांच्या मित्रांना मानसन्मान देण्याचा एक सामाजिक संदेश दिला आहे.
असा आहे लग्नाचा करारनामा
कृष्णा : सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरचं असेल
सायली : मी कृष्णाकडे शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाही
सायली : मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीला जायला आडवणार नाही (महिन्यातून दोन वेळा)
कृष्णा : मी सायलीची आणि आई वडिलांची ही सेवा करेल
सायली : मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल
कृष्ण व सायली ः आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू






