प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करण्याला फाटा देत थेट एबी फाॅर्मचे वाटप केल्याने सोमवारी चांगलाच गोंधळ उडाला. पक्षाने त्या त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांकडे एबी फाॅर्म वाटपासाठी दिले होते. त्यामुळे, ज्यांना हे फाॅर्म मिळाले त्यांनी शक्तीप्रदर्शन करत सोमवारी दिवसभरात आपले अर्ज दाखल केले. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांची नावे पाहिली तर पक्षाने तब्बल ३० ते ३५ माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखविला आहे. आरक्षण तसेच इतर कारणास्तव काही प्रभागात माजी नगरसेवकांच्या कुटूंबियांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ही संख्या मोठी असल्याने तसेच आपले नाव कापले गेल्याने या माजी नगरसेवकांनी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना कोणीही प्रतिसाद देत नसल्याने या नाराजांनी सोशल मिडीयावर पक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षाकडून काही ठराविक प्रभागांच्याच नगरसेवकांना एबी फार्म दिले असून अनेकांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले तर उद्या ( मंगळवारी) उर्वरीत उमेदवारांना एबी फाॅर्म दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे, फाॅर्म न मिळाल्याने अनेक दिग्गज उमेदवार प्रतिक्षेत आहेत. दोन प्रभागात नवीन चेहरे भारतीय जनता पक्षाने सोमवारी वाटप केलेले एबी फाॅर्म पाहता दोन प्रभाग २५ शनिवारपेठ- महात्माफुले मंडई आणि प्रभाग २० डेक्क्न जिमखाना- हॅपी काॅलनीमध्ये सर्व नवीन उमेदवार दिले आहेत. प्रभाग २५ मध्ये कै. मुक्ता टिळक आणि आमदार हेमंत रासने यांच्या दोन जागा रिक्त झाल्यावर मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी देण्यात आली. दिवंगत खासदार गिरिश बापट यांची सून स्वरादा बापट यांना उमेदवारी दिली असून माजी नगरसेवक राजेश येनपूरे तसेच गायत्री खडके यांच्या जागेवर स्वप्नाली पंडीत तसेच बापू मानकर यांना संधी दिली आहे. प्रभाग २० मध्ये माजी नगरसेवक जयंत भावे, दिपक पोटे तसेच नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे यांना उमेदवारी नाकारत मंजूश्री खर्डेकर, मिताली साळवेकर, पुनीत जोशी आणि सुनील पांडे यांना संधी दिली आहे. यांचा पत्ता कट ? संदीप जऱ्हाड, सुनीता गलांडे, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे, प्रसन्न जगताप, गायत्री खडके, दीपक पोटे, शंकर पवार, राजेश येनपुरे, वृषाली चौधरी, नीता दांगट, अर्चना मुसळे, श्रध्दा प्रभुणे, ऐश्वर्या जाधव, नाना सांगडे, बापुसाहेब कर्णे गुरूजी, सोनाली लांडगे, राहूल भंडारे, संगिता ठोसर, सरस्वती शेंडगे, श्वेता-खेसे गलांडे, स्वाती लोखंडे, राजश्री काळे, मुक्ता जगताप, स्वप्नाली सायकर, मनिषा कदम, साईदिशा माने