पुणे | शहरातील किमान तापमानात सातत्याने घट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने रात्रीच्या थंडीचा जोर वाढलेला आहे. गुरूवारी (दि.२२) शहरातील किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके होते. तर गेल्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यातीलच्या एनडीए आणि शिरूर तालुक्यातील किमान तापमान ११ अंशाच्या खाली नोंदविण्यात आले.
दरम्यान, पुढील दोन दिवस शहरातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट होईल. मात्र, हवामानातील बदलामुळे दि. २४ फेब्रुवारीनंतर आकाश ढगाळ आणि किमान तापमानात वाढ होण्यास सुरवात होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
एक कमी दाबाची रेषा मराठवाड्यापासून दक्षिण तमिलनाडूपर्यंत जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील. तर, विदर्भ आणि मराठवाड्यात दि. २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हलका पाऊस पडेल. विदर्भातील काही भागात हलका तर दि. २५ आणि २६ रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.





