Deepak Tijori : अंगावर काटा आणणारा चार तासांचा प्रसंग; दीपक तिजोरी यांच्या लेकीसोबत घडली होती भयंकर घटना, घरातून बाहेर पडली अन्…
Deepak Tijori : समाराचं अपहरण झाल्याची बातमी तिच्या आई वडिलांनी समजल्यानंतर त्यांच्या पायखालची जमीनच सरकली.

Deepak Tijori : २००९ मध्ये बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरी आणि त्यांच्या कुटुंबावर एक मोठं संकट कोसळलं होतं. त्यांची अवघ्या १३ वर्षांची मुलगी समारा तिजोरी हिचं मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यावरून भरदिवसा अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं याविषयी जाणून घेऊयात…
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना २००९ च्या काळात घडली होती. दीपकतिजोरी यांची मुलगी समारा एकेदिवशी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एकटीच घराबाहेर पडली होती. मुंबईतील लोखंडवाला परिसरात ती चालत असताना अचानक एक ऑटो-रिक्षा तिच्याजवळ येऊन थांबली.
काही क्षणांतच एका तरुणाने या रिक्षातून उतरून समाराला जबरदस्तीने ओढून रिक्षात बसवलं. त्यानंतर तिला मालाडमधील एका लॉजमध्ये ठेवण्यात आलं होतं. समाराचं अपहरण करण्यासाठी तरुणाने नियोजित कट आखला होता. त्यानुसार सगळ्या गोष्टी घडल्या.
समाराचं अपहरण झाल्याची बातमी तिच्या आई वडिलांनी समजल्यानंतर त्यांच्या पायखालची जमीनच सरकली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दखल घेत समाराचा शोध घेण्यास सुरूवात केली. तिच्या शोधासाठी महत्त्वाची साक्षीदार ठरली ती समाराची मैत्रीण. तिने संपूर्ण प्रकार पाहताच तातडीने दीपक तिजोरी यांना याबाबत माहिती दिली.
यानंतर दीपक तिजोरी आणि त्यांच्या पत्नी शिवानी यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या घटनेनंतर अवघ्या चार तासांत समारा सुखरूप घरी परतल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. प्रसंगावधान आणि धाडसाच्या जोरावर ती अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी ठरली होती. मात्र, तिचे अपहरण नेमकं कशासाठी आणि का करण्यात आलं होतं याविषयी ठोस अशी माहिती समोर आली नव्हती.
पुढील तपासात मालाडमधील २६ वर्षीय प्रीतेश नावाच्या तरुणाचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले. नंतर त्याला अन्य एका गंभीर गुन्ह्याप्रकरणीही अटक करण्यात आली होती. या घटनेने दीपक तिजोरी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला होता. मात्र, काळाच्या ओघात समाराने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख
आज समारा तिजोरी मनोरंजन क्षेत्रातील एक परिचित चेहरा बनली आहे. तिच्या ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे ती सोशल मीडियावरही चर्चेत असते. समाराने ‘बॉब बिस्वास’ (२०२१), ‘मासूम’ (२०२२) आणि ‘दलदल’ (२०२६) यांसारख्या चित्रपट व वेब सिरीजमध्ये काम करत अभिनय क्षेत्रात आपला स्वतः ठसा उमटवला आहे.







