kakool Trailer : रहस्य, भय आणि सूडाचा थरार! ‘काकुळ’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
kakool Trailer : मोनालिसा बागलने यापूर्वीही काही मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

kakool Trailer : रहस्य, भय आणि सामाजिक सूडभावना यांची अनोखी सांगड घालणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘काकुळ’चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागल मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिची भूमिका यावेळी नेमकी कशी असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
मोनालिसा बागलने यापूर्वीही काही मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, ‘काकुळ’मधून ती एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसह मराठी सिनेरसिकांचेही या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज रघुनाथ पडवळ यांनी केले आहे. मोनालिसा बागलसोबत अक्षय टंकसाळे, संजय खापरे, यश डिंबळे, भूषण मंजुळे, आरती शिंदे, विवेक यादव आणि प्रकाश धिंडले हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘काकुळ’ची कथा संग्राम या गावातील श्रीमंत आणि राजकीय वारसा लाभलेल्या तरुणाभोवती फिरते. संग्रामच्या आयुष्यात कल्पना नावाच्या तरुणीचा प्रवेश होतो आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडू लागतात. या घटनांमागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे? कल्पना आणि संग्राम यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा एकमेकांशी काय संबंध आहे? या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.
भयपटासोबत सामाजिक वास्तवाचीही जोड
‘काकुळ’च्या माध्यमातून मराठी रहस्यपट आणि भयपटांच्या पारंपरिक चौकटीपेक्षा काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रहस्य आणि थरारासोबतच सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळण्याची शक्यता आहे.
ट्रेलरमुळे चित्रपटाच्या कथेत दडलेलं रहस्य अधिकच गडद झालं असून, संग्राम आणि कल्पनाच्या आयुष्यात पुढे नेमकं काय घडणार, याची उत्सुकता वाढली आहे. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रेक्षकांना नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Prasad Recipes: गणपती बाप्पासाठी मोदकांव्यतिरिक्त बनवा हे ७ चविष्ट प्रसाद





