Abhijit Vanjari : काँग्रेसचा शानदार विजय! अखेर अभिजीत वंजारींनी मैदान मारलं; फडणवीसांच्या होमपीचवर भाजपला धक्का
Abhijit Vanjari : या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्यामुळे खरी रंगत आली. त्यांना २५ हजार मते मिळाली.

Abhijit Vanjari : राज्यातील पाच ठिकाणच्या विधानपरिषदेच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. २७ तारखेपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर आता राज्यातील ३ ठिकाणी महाविकास आघाडी आणि दोन ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होमपीचवर अटीतटीच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. नागपूर पदवीधर मतदार संघातून भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात टफ फाईट झाली. दोन्ही उमेदवारांमधील चुरशीच्या लढतीत अखेर अभिजीत वंजारी यांनी मैदान मारत विजयाचा गुलाल उधळला.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्यामुळे खरी रंगत आली. त्यांना २५ हजार मते मिळाली. त्यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांमुळे मतमोजणीचे समीकरण बदलल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागपूरच्या निकालाचे राज्यभरात चर्चा होत आहे.
सुक्ष्म नियोजन पण…
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचारात हिरारीने भाग घेतला. सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी सुक्ष्म नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानाचे गणित जुळवण्यात पक्षाला यश आले नाही.
कोण आहेत अभिजीत वंजारी?
नागपूर पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवणारे अभिजीत वंजारी यांचा हा सलग दुसरा विजय आहे. २०२० मध्येही त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. व्यवसायाने वकील असलेल्या वंजारी यांनी विद्यार्थी दशेतच राजकारणात प्रवेश केला.
अभिजीत वंजारी हे नागपूरमधील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे वडील गोविंदराव मारोतराव वंजारी हे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. वडिलांच्या राजकीय वारशातून प्रेरणा घेत अभिजीत वंजारी यांनीही राजकीय क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली.
शिक्षण आणि राजकीय कारकीर्द
अभिजीत वंजारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून बीए आणि एलएलबी या पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या सिनेट तसेच व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून काम केले आहे.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी संघटनेतून झाली. १९९८ ते २००२ या काळात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे महामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदावरही त्यांनी काम केले.
याशिवाय उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसचे निवडणूक पर्यवेक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. विद्यार्थी राजकारणापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास विधानपरिषदेतील सलग दुसऱ्या विजयापर्यंत पोहोचला आहे.
Maval News: मावळचा इंद्रायणी महागणार! अपुऱ्या पावसाने भातपिकाच्या उत्पादनात घट





