पुसेसावळी, (प्रतिनिधी) – राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळवून देण्याची ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली. महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेतील दोन महिन्यांच्या हप्त्याचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर योजनेच्या अंमलबजावणीसाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पुसेसावळी मंडल व कोरेगाव तालुक्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सीआरपी व शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठका पुसेसावळी, ता. खटाव आणि वाठार, ता. कोरेगाव येथे झाल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. योजना अंमलबजावणी समितीच्या खटावच्या अध्यक्ष दीपाली खोत, तहसीलदार बाई माने, कोरेगावचे तहसीलदार संगमेश कोडे, खटावचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, कोरेगाव तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी सुजीतकुमार इंगवले, भाजप किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, रहिमतपूर मंडलाध्यक्ष भीमराव पाटील, वर्धन अॅग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. धैर्यशील कदम म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अजून काही महिला वंचित असतील, तर त्यांचे फॉर्म दिवाळीपर्यंत भरून घ्यावेत. योजनेत नामंजूर झालेल्या अर्जांमधील कागदपत्रांच्या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विविध योजना यशस्वीरित्या सुरू असून, महायुती सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे. कराड उत्तरमधील गावोगावी रामराज्य रथ उपक्रम सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. कोणत्याही योजनेचा लाभ घेताना अडचण आली, तरी गावात भाजपच्यावतीने सुरू असलेल्या जनसुविधा केंद्रात संपर्क साधावा. रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक बहिणीच्या खात्यावर योजनेचे पैसे आल्याने शासनाने बहिणींना ओवाळणीच दिली आहे. समाजातील कोणताही घटक योजनांच्या लाभपासून वंचित राहू नये, याची खबरदारी शासकीय यंत्रणांनी घ्यावी. दीपाली खोत म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. यावेळी विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, कराड उत्तर मंडलाध्यक्ष शंकरराव शेजवळ, युवा नेते राजकिरण पाटील, किसान मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष रुक्मिणी जाधव, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड, कराड उत्तर सरचिटणीस नवीन जगदाळे, तुकाराम नलवडे, प्रकल्प अधिकारी पाटोळे, बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.