Satara | पुसेसावळीतील नागरिक वाहतूक पोलिसांच्या भूमिकेत

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – सातारा-सांगली मार्गावरील पुसेसावळी हे गाव रहदारीचे बनले आहे. सांगलीहून सातार्याला, तसेच कराडहून इंदापूरला जाणारा हा रस्ता इतर रस्त्यांपेक्षा बर्यापैकी चांगला असल्याने, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.
त्यामुळे पुसेसावळीच्या दत्त चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी येथील नागरिकच पुढाकार घेत आहेत.
बँक, बाजारपेठ, शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, सणादिवशी होणारी गर्दी यामुळे येथील दत्त चौकात नेहमी गजबजलेला असतो. दत्त चौकातून जाणारा विटा-महाबळेश्वर या राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.
ट्रक, बसेस, चारचाकी व दुचाकी वाहनांची वाढलेली वर्दळ आणि रस्त्यावरच वाहने उभी केल्याने, दत्त चौकातून वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागते. वाहने बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकू पडत आहेत.
ही वाहतूक कोंडी स्थानिक नागरिक दूर करताना दिसत आहेत. आठवडा बाजारादिवशी बुधवारी वाहतूक कोंडीमुळे कडेपूर, कराड, औंध रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. कराड, वडूज, सांगली, सातारा या शहरांकडे जाणारी वाहतूक दत्त चौकातून जाते.
दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, आझाद चौकात काही वाहने रस्त्यावर कायमस्वरूपी, तर काही वाहने अस्ताव्यस्त लावलेली असतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी वाढते. या रस्त्यावरून पादचारी, वयस्कर व्यक्ती, महिला व लहान मुलांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.





