पाटणा – बिहारमधील पाटणाच्या दानापूर न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या एका कैद्यावर पोलिसांसमोरच गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे. दोन जणांनी गोळीबार केला असून दोघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली. बिहारच्या सिंकदरपूर येथील अभिषेक कुमार ऊर्फ छोटे सरकार (३४) याच्यावर हत्येसह इतर काही गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. शहरातील बेऊर कारावासातून त्याला पाटणाच्या दानापूर न्यायालयात सुनावणी आणण्यात आले, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. दानापूर न्यायालयाच्या आवारात आल्यानंतर दोन इसमांनी अभिषेकवर हल्ला करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. पोलिस अभिषेकला वाचवू शकले नाहीत, मात्र आरोपींना लगेच अटक करण्यात आली. पाटणा पश्चिमचे पोलिस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही हल्लेखोरांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या हल्ल्यापाठी त्यांचा काय उद्देश होता, कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केले? याची आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.