भोसरी, (वार्ताहर) – तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त स्वरांजली कला क्रीडा मंचद्वारे सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला हरिशचंद्र डोळस यांना आदर्श माता तर प्रदीप सोनवणे आणि संकेत कांबळे यांना युवा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर या वेळी घेण्यात आलेल्या वंदन महामानवाला या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम भोसरीतील संत तुकारामनगरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील मैदानात स्वरांजली कला, क्रीडा मंचाद्वारे घेण्यात आला. माजी नगरसेवक रवी लांडगे, विकास डोळस, प्रियांका बारसे, अनुराधा गोफणे, अभिराज गव्हाणे, संदीप राक्षे, कविता भोंगाळे आदींनी नागरिकांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सैनिक रामचंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते हरीष डोळस, राजू गंगावणे, दीपक डोळस, चंद्रकांत डोळस, मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळस, दिनेश पहुरकर, धम्मपाल गायकवाड, प्रभाकर माने, विशाल वाकोठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ पवार होते. या वेळी सामुदायिक बुद्धवंदना, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन घेण्यात आले. या वेळी घेण्यात आलेल्या वंदन महामानवाला या कार्यक्रमात गायक कुणाल वराळे, श्रावणी महाजन, शिरीष पवार आदिंनी सादर केलेल्या समाज प्रबोधनपर बुद्ध भीम गीतांनी वातावरणात रंग भरला. उपस्थितांना अन्नदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियांका पहुरकर, भाग्यश्री गायकवाड, नलिनी डोळस, सुजाता पवार, प्रतीक डोळस, हर्षल वाघ, ऋषीकेश गायकवाड, संतोष धनेश्वर, कैलास तायडे, तुषार रामटेके, गुणवंत नाखले, संगीता वाघ, सुनीता माने, अर्चना वरगट यांनी परिश्रम घेतले. विजय भालेराव आणि राजेश डोळस यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शुभांगी पाचपोते यांनी केले. प्रकाश डोळस यांनी आभार मानले.