काका-पुतण्यामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यासाठी रंगणार ‘पॉवर प्ले’; अनुभवणार शिवसेनेतील घडामोडींची पुनरावृत्ती !

मुंबई – महाराष्ट्राने अवघ्या वर्षभरात सत्तानाट्याचा नवा अंक पाहिला. पुन्हा उपमुख्यमंत्री बनत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी नव्याने राजकीय भूकंप घडवणारे बंड केले. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. त्यातून राष्ट्रवादीच्या ताब्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये संघर्ष अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीतील त्या संभाव्य पॉवर प्लेमुळे राज्यातील दुसरा पक्ष शिवसेनेतील घडामोडींची पुनरावृत्ती अनुभवण्याची दाट शक्यता आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी रविवारी मंत्रिपदांची शपथ घेतली. धक्कातंत्राचा अवलंब झालेली ती घडामोड संपूर्ण राज्यासह शरद पवार यांच्या दृष्टीनेही शॉकिंग स्वरूपाची ठरली. अर्थात, पुतण्याच्या हालचालींमागे काकांचा आशीर्वाद असल्याची चर्चाही रंगली. त्याला कारणीभूत ठरली ती दोन्ही पवारांनी मांडली भूमिका.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या आधारावरच भविष्यातील निवडणुका लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले. शरद पवार यांनीही बंडाच्या दिवशी संघर्षाची भूमिका टाळली. आम्ही न्यायालयात जाणार नाही. कोणतेही भांडण न करता आम्ही जनतेत जाऊ. नव्या जोमाने पक्ष उभारणी करू, असे ते म्हणाले. त्यामुळे काका आणि पुतण्या संघर्ष टाळत असल्याचे मानले गेले.





