संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुंबई : संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत केली आहे. स्मारकासाठी सरदेसाई वाडा अधिग्रहित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत. ते शौर्याचे प्रतीक होते. शंभुराजे स्वराज्य रक्षक आहेत. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था, असेही ते म्हणाले.
बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला. तर आज अबू आझमी यांना अधिवेशन संपेपर्यत निलंबित करण्यात आले आहे. यासह, नागपूरच्या कोरटकर प्रकरणावरूनही विरोधकांनी पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले. आजच्या विधानसभामध्ये छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीवर लक्ष वेधले. संतांचा हा महाराष्ट्र आहे. मात्र, आजचे हे महाराष्ट्र कुठल्या दिशेन जात आहे? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
आमदार राम कदम विरोधकांवर संतापले
भाजपचे आमदार राम कदम आज विरोधकांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. काल सदनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वीर संभाजी महाराजांचे शौर्य सांगत होते. संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा गायली जात असताना, तेव्हा आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील हे सर्व त्याठिकाणी घोषणा देत होते, असे भाजप आमदार राम कदम म्हणाले. संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून संपूर्ण विरोधी पक्ष गलिच्छ राजकारण करत होता, असा आरोपही राम कदम यांनी केला. असे राजकारण करण्याचे काय कारण होते? असा सवालही कदम यांनी केला.
दहा महिन्यात बीडमध्ये 36 हत्या – देवेंद्र फडणवीस
बीडमध्ये पाच वर्षात तब्बल 276 हत्या झालेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहांमध्ये याबाबत लेखी उत्तर दिले आहे. 766 जणांनी पाच वर्षात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. विशेष म्हणजे दहा महिन्यात एकूण 36 हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
कोर्टाने 2017 मध्येच निर्दोष मुक्त केले- गोरे
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीसांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरे स्पष्टीकरण दिले आहे. विनयभंग प्रकरणातून 2019 मध्येच निर्दोष मुक्त करण्यात आले होते, असे गोरे म्हणाले. तसेच माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात मी सभागृहात हक्कभंग आणणार असून अब्रूनुकसानीचा देखील दावा ठोकणार, असा इशाराही त्यांनी दिला.
मविआच्या आंदोलनाला मिटकरींची उपस्थिती
महापुरुषांचा अपमान करणाऱ्याविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन केले. या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजप असे या आंदोलकांनी हातात घेतलेल्या बोर्डवर लिहलेले आहे.





