Thane Election BJP | मोक्का अंतर्गत कारवाई आणि गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तडीपारीची कारवाई झालेला गुंड मयूर शिंदे याचा ठाण्यात भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा सोमवारी कार्यक्रम होता. सावरकर नगरमधील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मयूर शिंदे याने जोरदार तयारी केली होती. मात्र शेवटच्या क्षणी हा पक्षप्रवेश थांबवण्यात आला. ठाण्यातील या कार्यक्रमाला सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे बॅनर शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर झळकले होते. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्याचे कारण सांगत मयूर शिंदेचा पक्षप्रवेश गुंडाळला. मयूर शिंदे याचा पक्षप्रवेश शेवटच्या क्षणी स्थगित केल्याबाबत भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले की, “महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होऊन आज आचारसंहिता लागली. त्यामुळे अचानक बैठका लागल्या आणि भाजपचे वरिष्ठ नेते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मात्र, येथील उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रम नियोजित पद्धतीने पार पडला. तसेच कार्यकर्त्याला काम करण्यासाठी पक्षात प्रवेश करण्याची गरज नसते.” भाजपच्या वरिष्ठांचा सावध पावित्रा दरम्यान, भाजपमध्ये गुंडाचा प्रवेश होत असल्याच्या कारणावरून भाजपवर टीका होत होती. असे असतानाच पक्ष प्रवेशाच्या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ नेते फिरकलेच नाही. आचारसंहिता जाहीर झाल्याने हा पक्ष प्रवेश रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या पक्षप्रवेशावरून प्रसार माध्यमामधून टीका झाल्याने ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वरिष्ठांनी सावध पावित्रा घेत हा पक्ष प्रवेश रद्द केल्याचे म्हंटले जात आहे. मयूर शिंदे कोण आहे ? काही वर्षांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी प्रकरणी मयुर शिंदे याच्या नावाची चर्चा सुरु होती. मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील हत्या, खंडणी यासारखे अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो भांडूपमधून ठाण्यात राहायला आला. Thane Election BJP | पूर्वी शिवसेनेत असलेल्या मयुर शिंदे याने निवडणूकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून २०१७ मध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी दिली. तो सध्या ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधून लढण्याची तयारी करत आहे. भाजपमधून तिकीट मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्याचा पक्षप्रवेश ऐनवेळी स्थगित करण्यात आला. Thane Election BJP | हेही वाचा: इमरान हाश्मीसोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; वेब सीरिजमध्ये दिसणार नव्या अंदाजात