बीड पोलिसांची गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई: आता ‘या’ टोळीवर ‘मोक्का’

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारने बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करत नवनीत कावत यांच्याकडे जबाबदारी सोपवली. नव्याने पदभार स्वीकारलेल्या कावत यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवत महाराष्ट्र नियंत्रित संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाईला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीवर मोक्का लावल्यानंतर आता केज तालुक्यातील विडा येथील अवादा पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण व चोरी करणाऱ्या टोळीवरही मोक्का लागू करण्यात आला आहे.
७ एप्रिल रोजी वॉचमन अभिजीत दुनघव याला सतरंजीने बांधून १२.८७ लाख रुपयांचे साहित्य (रोटर केबल, स्टार्टन केबल, अर्थिंग केबल) चोरणाऱ्या टोळीविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे आणि लालासाहेब सखाराम पवार या चार आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. इतर सहा फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीवर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील केज, नेकनूर, ढोकी, वाशी पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत यासह ११ गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या टोळीवर मोक्का लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्याकडे पाठवला होता, ज्याला मंजुरी मिळाली. याप्रकरणी १० जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. यापूर्वी बीड पोलिसांनी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्या टोळ्यांसह चार टोळ्यांवर मोक्का लागू केला आहे. सध्या कराड आणि त्याची टोळी तुरुंगात आहे.





