Signal system : सिग्नल यंत्रणेतील बिघाड ठरू शकतो वाहतूक कोंडी; अपघाताचे कारण
Signal system : वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

पिंपरी – शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांसोबत ट्रॅफिक वॉर्डनचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, शहरातील अनेक प्रमुख चौकांमधील सिग्नल यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. सिग्नल बंद असताना संबंधित ठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित नसल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत.
सिग्नल यंत्रणा बंद असल्याने चौकांमध्ये वाहनांची वर्दळ वाढते. कोणत्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्यायचे, याबाबत संभ्रम निर्माण होतो. अशा वेळी वाहनचालकांना स्वतःच मार्ग काढावा लागतो. त्यातून वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढतो.
विशेष म्हणजे, सिग्नल बंद असताना अचानक यंत्रणा सुरू झाल्यास वाहनचालकांची तारांबळ उडते. त्यामुळे सिग्नलच्या नियमित देखभालीचा आणि वाहतूक नियमनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. कामावर जाणारे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहू वाहनांमुळे चौकांवरील वाहतुकीचा ताण वाढतो. अशा परिस्थितीत सिग्नल यंत्रणा सुरळीत सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र, सिग्नल बंद असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी उपस्थित नसल्यास वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
शहरातील पुनावळे, ताथवडे तसेच औंध-रावेत बीआरटी मार्गावरील काही चौकांमध्ये ही समस्या अधिक जाणवत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. या भागातील वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेतील बिघाड तातडीने दूर करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहे.
अचानक सिग्नल सुरू झाल्यास अपघाताची भीती
सिग्नल बंद असल्याने वाहनचालक आपापल्या अंदाजानुसार चौकातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी सिग्नल अचानक सुरू झाल्यास काही वाहनचालक थांबतात, तर काही जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यातून वाहनांची धडक होऊन कीरकोळ अपघातही घडतात.
विशेष म्हणजे सिग्नल यंत्रणा बंद असल्यास त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी उपस्थित राहून वाहतुकीचे नियमन करणे अपेक्षित आहे. मात्र नेमकं असाच वेळी कर्मचारी अनुपस्थित असल्याच्या तक्रारींमुळे वाहतूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दंडात्मक कारवाईबाबतही नाराजी
वाहतूक नियमनाच्या नावाखाली काही ठिकाणी कर्मचारी वाहनचालकांवर कारवाईसाठी पुढे येतात. मात्र सिग्नल बंद असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याची नाराजी वाहनचालक व्यक्त करत आहेत. काही वाहनचालकांनी अशा परिस्थितीत दंडात्मक कारवाईपेक्षा आधी वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




