Bhama Askhed Dam: नव्या वर्षात भामा आसखेडचे १६७ एमएलडी पाणी येणार; जानेवारी अखेर काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Bhama Askhed Dam: पाणी कपातीने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सध्या पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. भामा आसखेड धरणातून शहराला दररोज १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
या योजनेचे काम जानेवारी २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले असून, नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून शहराला अतिरिक्त पाणी मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यानुसार पाण्याची मागणीही वाढत आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा आणि वाढती मागणी यांचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पाणी कपातीमुळे नागरिकांची गैरसोय होत असून, नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.
या पार्श्वभूमीवर भामा आसखेड धरणातून अतिरिक्त मिळणाऱ्या पाण्याकडे शहरवासियांचे डोळे लागले आहेत. या योजनेतून दररोज १६७ एमएलडी पाणी उपलब्ध झाल्यास शहराच्या एकूण पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरील ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच, पाणी कपातीचे नियोजन बदलणे किंवा नागरिकांना अधिक नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होण्याची अपेक्षा आहे.
‘भामा आसखेड पाणी योजनेच्या रखडलेल्या कामांसाठी नवीन कंत्राटदार नियुक्तीनंतर कामाला वेग आला आहे. प्रत्यक्ष काम वेगात सुरू असून सातत्याने या कामाचा आढावा घेतला जात आहे. कामासाठी दिलेल्या मुदतीत ते पूर्ण करण्याचे नियोजन केले असून येत्या जानेवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण करून फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष पाण्याची चाचणी घेण्याचे नियोजन आहे.’ – प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.





