Shiv Sena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ..! एकनाथ शिंदेंचा शेवटचा दसरा मेळावा ठरणार?
Shiv Sena : अशातच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Shiv Sena : आज विजयादशमीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र मेळावे आयोजित केले जात आहेत. यंदाही मुंबईत दोन्ही गटांचे मेळावे होत असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मेळाव्यांकडे लागले आहे. अशातच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे यांचा हा कदाचित शेवटचा दसरा मेळावा ठरू शकतो, असा मोठा दावा असीम सरोदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी शिवसेनेचे नाव आणि पक्षाची ओळख यावरून शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.
असीम सरोदे यांनी नेमकं काय म्हटलं?
असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, पक्षाचे नाव चोरून मिळवलेली ओळख घेऊन ‘सत्तानाथ’ यांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला, तर आश्चर्य वाटायला नको.
त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे, यासंदर्भातील कायदेशीर लढाई अद्याप सुरू असल्याने सरोदे यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले जात आहे.
पक्षाचं नाव चोरून मिळवलेली ओळख घेऊन सत्तानाथ यांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला, तर आश्चर्य वाटायला नको!
आधी पक्षचोरी, मग निवडणुकीतल्या कथित गैरप्रकारांचे प्रयोग आणि आता सत्तेच्या नाटकाचा अखेरचा अंक!
लोकशाहीच्या रंगमंचावर सगळे प्रयोग यशस्वी झाले असं वाटत असलं, तरी न्यायालयाचा पडदा सत्तेचा खेळ संपवेल, हे अजून बाकी आहे!
कारण सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीत अंतिम शब्द सत्तेचा नसतो—तो संविधानाचा आणि न्यायाचा असतो!— Asim Sarode (@AsimSarode) October 19, 2026
शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये संघर्ष सुरू झाला. या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, त्याच्या निकालाकडे दोन्ही गटांचे समर्थक आणि राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला आहे. शिवसेनेवरील अधिकार आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेशी संबंधित मुद्दे त्यांनी न्यायालयासमोर मांडले आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू ज्येष्ठ वकील नीरज कौल यांनी मांडली आहे. त्यामुळे आता शिवसेना कोणाची? या प्रश्नाचे कोर्टाचे उत्तर कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





