Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा मोठा दणका.! ‘या’ शहरात दूध भेसळ विरोधात केली सर्वात मोठी कारवाई
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सुरक्षित व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यभर धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

Tukaram Mundhe – महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सुरक्षित व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यभर धडक मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदेर्शानुसार परभणी येथे दूध भेसळीविरोधात विशेष कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाने शहरातील वसमत रोडवरील काळी कमान व शिवशक्ती कॉर्नर परिसरात दुचाकीवरील कॅनमधून तसेच रस्त्यावरील स्टॉलवर किरकोळ दूध विक्री करणा-या ९ विक्रेत्यांकडून दुधाचे नमुने घेतले. हे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त अ. ए. चौधरी व पवन खताळ तसेच सह आयुक्त एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे, तुषार घोपे आणि अमृता दुधाटे यांच्या पथकाने केली. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अशा धडक मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांनी परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.






