Tukaram Mundhe : तक्रार करणं झालं आणखी सोपं! तुकाराम मुंढेंनी काढला सर्वात सोपा मार्ग; नेमकं काय केलं?
Tukaram Mundhe : त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून बेकायदेशीर व्यवसायावर मोठा आळा बसताना दिसत आहे.

Tukaram Mundhe : सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्यासह देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून बेकायदेशीर व्यवसायावर मोठा आळा बसताना दिसत आहे.
तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी येत्या काळात कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारीद्वारे द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नागरिक तक्रार पोर्टल सुरू
राज्यात कुठेही भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे आढळल्यास नागरिकांना थेट अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार नोंदवता येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. आता नागरिकांना त्यांची तक्रार करण्याचा मार्ग तुकाराम मुंढेंनी आणखी सोपा केला आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नागरिक तक्रार पोर्टल सुरू केले असून, यामुळे तक्रार प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ केली आहे.
याविषयीची माहिती तुकाराम मुंढेंनी फेसबुक पोस्टवरून दिली आहे. पोस्टमध्ये तुकाराम मुंढे म्हणाले, “सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर शासन नागरिकांसाठी अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे होय. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेले एआय-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.”
नेमकं काय होणार?
या पोर्टलच्या माध्यमातून कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही नियमभंगाबाबत सहज तक्रार नोंदवू शकणार आहे. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित तक्रार स्पष्ट, सविस्तर आणि आवश्यक मुद्द्यांसह आपोआप तयार करेल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
एआय प्रणाली तक्रार तयार करून ती थेट संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते. तक्रारीच्या निपटाऱ्यात विलंब झाल्यास स्वयंचलितपणे पुढील स्तरावरील अधिकाऱ्यांकडे (Auto Escalation) प्रकरण पाठवले जाते. तसेच तक्रारीचा संपूर्ण प्रवास नागरिकांना पारदर्शकपणे ट्रॅक करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे : तुकाराम मुंढे
नागरिकांचा सक्रिय सहभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रशासनाची उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुंढे यांनी नमूद केले. “प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर- (FDA Complaint Number)
टोल फ्री क्रमांक : 1800222365
ई-मेल : [email protected]
तक्रार कशी नोंदवायची?
- अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल.
- अन्न सुरक्षा असो वा औषध सुरक्षा दोन्ही तक्रारींसाठी एकच व्यासपीठ.
- तक्रार नोंदवण्यासाठी: https://complaints.mahafda.in
- एका क्लिकवर तक्रार सबमिट करा आणि तिची स्थिती ट्रॅक करा. तुमची जागरूकता म्हणजेच सर्वांची सुरक्षा. आजच तक्रार नोंदवा. या सोप्या पद्धतीने तुकाराम मुंढेंनी तक्रार कशी नोंदवायची हे सांगितलं आहे.





