Anand Dubey : उबाठा गटाला सर्वात मोठा धक्का! आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाने साथ सोडली
Anand Dubey : आनंद दुबे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Anand Dubey : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आता आनंद दुबे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून आनंद दुबे हे ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात दुपारी १ वाजता त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतभेद?
आनंद दुबे यांनी पक्ष सोडण्यामागे हिंदुत्व आणि सनातन धर्मासंदर्भातील वैचारिक मतभेद असल्याचे कारण दिल्याचे सांगितले जात आहे. पक्षाची विचारधारा आणि सार्वजनिक स्तरावर मांडली जाणारी भूमिका यांच्याशी जुळवून घेणे कठीण होत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळख
आनंद दुबे हे आमदार आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय मुद्यांवर ठाकरे गटाची भूमिका प्रभावीपणे सातत्याने मांडली होती. आता त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आल्याने पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आनंद दुबे यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





