Pune District : उसाला संजीवनी, तर कांद्याला फटका
Pune District : या भागातील शेतकऱ्यांना दोन दिवस सतत पडलेल्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तर इतर पिकांचे मात्र नुकसान होणार आहे.

केंदूर :शिरुर तालुक्यातील पश्चिम भागात सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला संजीवनी मिळणार असली तरी कांदा पिकाचे नुकसान होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. करंदी, पिंपळे जगताप, मुखई, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचे उत्पादन घेतले जाते. दुष्काळाचे सावट कायम असताना चासकमान कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत होता. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे ऊसाला संजीवनी मिळणार हे तर, कांदा पिकाला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
पाबळ, धामारी, खैरेनगर, खैरवाडी, केंदूर परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेतात. या भागातील शेतकऱ्यांना दोन दिवस सतत पडलेल्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तर इतर पिकांचे मात्र नुकसान होणार आहे.
पावसाचा कांदा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून पुढील काळात रोगराई वाढण्याचा आणि उत्पादन घटण्याचा धोका शेतकरी व्यक्त करीत आहेत. फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढण्यावरही शेतकऱ्यांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन आणि पीक व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. या पावसाने कांद्याच्या मानेवर पिळ पडणे, रोगराईचा प्रादुर्भाव वाढणे आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे. बदलत्या हवामानाच्या लहरींचा सर्वाधिक फटका कोणत्या पिकाला बसणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य मदत मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चासकमान कालव्याचे पाणी बंद झाले असल्याने उसाला पाणी कमी पडण्याची भीती होती. मात्र, या दिवसाच्या पावसामुळे उसाला दिलासा मिळाला आहे. पुढचे एक ते दीड आठवडे किमान पाण्याची गरज भासणार नाही.
-सागर सुरेश जगताप, ऊस उत्पादक शेतकरीअवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाला पीळ पडू शकतो. रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढू शकतो. त्यामुळे वार्षिक आर्थिक गणित कोलमडणार आहे.
– फक्कड डफळ, कांदा उत्पादक शेतकरी.





