कराड-कोल्हापूर महामार्गावर कामेरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी ठार
मृत बिबट मादीचा मृतदेह दत्त टेकडी ईश्वरपूर येथील वन विभागाच्या कार्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास वन विभाग करीत आहे.

पेठ (जि. सांगली)- पुणे बंगलुरु महामार्गावर कराड-कोल्हापूर दरम्यान कामेरीजवळील (ता. वाळवा) वेदांतिका मंगल कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका ३ ते ४ वर्षे वयाच्या बिबट मादीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की येथील प्रदीप विलास जाधव व संग्रामसिंह खासेराव पाटील पाटील यांनी बिबट जखमी अवस्थेत पडल्याची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी महामार्गावर मादी बिबट्याच्या पुढील पायांना गंभीर दुखापत होऊन, बिबट्या धडपडत असताना दिसले, त्यास रक्तस्राव झाला होता.
जखमी बिबट मादीला रेस्क्यू टीमने ताब्यात घेऊन उपचारासाठी रेस्क्यू व्हॅनमध्ये हलवत असताना तिचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
वन विभागाची तात्काळ कारवाई
सांगलीचे उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे , शिराळ्याचे वनक्षेत्रपाल रमेश कोबळे , मानद वन्यजीव रक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल इस्लामपूर डी. बी. बर्गे, वनरक्षक अमोल माळी, वनरक्षक भवानीनगर अमोल साठे, वनमजूर आणि रेस्क्यू टिममधील गौरव गायकवाड, प्रथमेश पोळ , पांडुरंग उगळे , भिवा कोळेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
मृत बिबट मादीचा मृतदेह दत्त टेकडी ईश्वरपूर येथील वन विभागाच्या कार्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास वन विभाग करीत आहे.





