देवासमोर दिवा लावला अन् घडली मोठी दुर्घटना; आगीत होरपळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी

पुणे – देवासमोर दिवा लावल्यानंतर हवेमुळे खिडकीचा पडदा दिव्याला चिकटल्यामुळे लागलेल्या आगीत आणि एसीचा कॉप्रेसरचा स्फोट झाल्यामुळे घरातील एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या घरात घडली.
वृद्धा संगवार (वय ६५ रा. शनश्री सुवर्ण युग सोसायटी, कोंढवा खुर्द) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. विजय विनोद कलढोणकर (वय ४४) मनोज बोरकर (वय ७५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. एनआयबीएम रस्त्यावरील सनफ्लॉवर आणि सनश्री सोसायटी आहे. रविवारी दुपारी सोसायटीतील घरात आग लागली.
घटनेची माहिती मिळताच कोंढवा अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घरातील गृहापयोगी साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. आग भडकल्याने वृद्धेला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गंभीर होरपळलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.




