भोर तालुक्यात ‘विशाल’ वादळ! बंटी कोंडे राष्ट्रवादीत प्रवेश करताच राजकीय समीकरणे ढवळली

भोर – तालुक्यातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून, हायवे पट्ट्यातील प्रभावशाली कार्यकर्ते विशाल उर्फ बंटी कोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील सत्ताधारी व विरोधक गोंधळलेल्या स्थितीत दिसत असून, भोर तालुक्यात एकप्रकारे ‘विशाल’ वादळ निर्माण झाले आहे.
कोंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले, “मी हा पक्षप्रवेश स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर माझ्या भागातील विकासासाठी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार शंकर मांडेकर यांच्या कामांनी प्रेरित होऊन मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत राहिल्याने जनतेचे प्रश्न अधिक वेगाने आणि प्रभावीपणे मार्गी लागतील, असा माझा विश्वास आहे.”
पक्षाकडून शब्द नाही, पण भूमिका स्पष्ट – कोंडे
पत्रकारांनी विचारले की पक्षाकडून आपल्याला तिकीट किंवा काही आश्वासन देण्यात आले आहे का, यावर कोंडे यांनी सांगितले, “अजून तरी मला पक्षाकडून कुठलाही शब्द मिळालेला नाही. मात्र, राष्ट्रवादी जो निर्णय घेईल त्यास मी पूर्णपणे पाठिंबा देईन आणि मान्य करीन.”
सभापतीपदासाठी इच्छुक, जनतेच्या मुद्द्यांना प्राधान्य
कोंडे यांनी पुढे सांगितले की, “मी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सभापती पदासाठी इच्छुक आहे. निवडून आलो तर सर्वात आधी माझ्या भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावेल. तसेच नसरापूरमधील ट्रॅफिक समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावरही तातडीने उपाययोजना करीन.”
शंकर मांडेकर यांनी दिली होती साथ देण्याची तयारी
माध्यमांशी बोलताना कोंडे यांनी खुलासा केला की, “मी जेव्हा आखाड भोजनाचा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा आमदार शंकर मांडेकर यांनी मला स्पष्टपणे खुली ऑफर दिली होती की, तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, आम्ही तुम्हाला निवडून येईपर्यंत साथ देऊ.” मात्र, त्यांनी ठामपणे सांगितले की, “हा प्रवेश फक्त आणि फक्त जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आहे.”
कोंडे यांचा पक्षांतराचा कारण स्पष्ट –
पूर्वी काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या कोंडे यांनी पक्षांतराच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना सांगितले, “संग्राम थोपटे आमदार असताना मी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो. पण अजितदादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांनी केलेली कामे पाहूनच मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”
नवीन चेहऱ्यांचा प्रवेश: निलेश कोंढाळकर व संदीप कदम यांची भूमिका
या प्रवेशसोहळ्यात निलेश कोंढाळकर यांनीही काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने जनतेची कामे करता येतील, यामुळे मी हा निर्णय घेतला.”
नसरापूरचे माजी उपसरपंच संदीप कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “नसरापूर गावात आमदार शंकर मांडेकर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. विशेषतः जे ‘बनेश्वर रस्त्याचे’ काम अनेक वर्षांपासून रखडले होते, ते आता दर्जेदार पद्धतीने सुरू होणार आहे.”
नसरापूरमध्ये विकास आणि कचऱ्यावर उपाय
कदम यांनी पुढे सांगितले की, “नसरापूरमधील विद्युत पोल अंडरग्राउंड केबलच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्नही मार्गी लागेल आणि अतिक्रमणाचे नुकसानही कमी होईल.” कचऱ्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “किकवी येथे कचरा प्रक्रिया यंत्रणा तयार असून नसरापूरचा कचरा तिथे हलवण्यात येणार आहे. यामुळे गावातील ही समस्या लवकरच सुटेल.”
शासकीय सुविधा एका ठिकाणी याव्यात यासाठी प्रस्ताव
नसरापूरचे विद्यमान सरपंच उषा कदम यांनी सांगितले की, “गावातील १९ गुंठे जागेवर नव्या ग्रामपंचायत इमारतीसह मंडल अधिकारी, तलाठी आणि इतर शासकीय कार्यालयांची उभारणी व्हावी, यासाठी प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला आहे. यामुळे बाजारपेठा सशक्त होतील आणि नागरिकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळतील.”
“मी सर्वसामान्यांचा माणूस” – कोंडे यांचा जनतेला संदेश
बातमीच्या अखेरीस बंटी कोंडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. माझ्या भागातील जनतेने मला जो विश्वास दिला आहे, तो मी खोटा ठरणार नाही. जनतेच्या आशीर्वादानेच मी काम करतोय आणि यापुढेही करीन.” त्यांनी जनतेला आवाहन करत म्हटले, “जे तुमचे प्रश्न सक्षमतेने सोडवू शकतात, त्यांच्या मागेच उभे राहा आणि त्यांना बहुमताने निवडून द्या.





