Bhavaninagar : श्री छत्रपती कारखान्याचा ऐतिहासिक निर्णय
Bhavaninagar : कारखान्याच्या सभासदांबरोबरच बिगर सभासद (गेटकेन) ऊस उत्पादकांनाही प्रति टन ३, ७०१ रुपये हाच समान दर दिला जाणार आहे. या एकूण रकमेतील वाढीव २०० रुपये आगामी दिवाळीच्या सणासुदीला अदा केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भवानीनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी ऐतिहासिक निर्णय घेत उसाला प्रति टन ३, ७०१ रुपये हा कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक उच्चांकी दर जाहीर केला आहे. कारखान्याने यापूर्वी पहिला हप्ता प्रति टन ३, ५०१ रुपये जाहीर केला होता; मात्र शुक्रवारी (दि. २७) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यामध्ये प्रति टन २०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कारखान्याच्या सभासदांबरोबरच बिगर सभासद (गेटकेन) ऊस उत्पादकांनाही प्रति टन ३, ७०१ रुपये हाच समान दर दिला जाणार आहे. या एकूण रकमेतील वाढीव २०० रुपये आगामी दिवाळीच्या सणासुदीला अदा केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर आणि सर्व संचालक मंडळाने हा विक्रमी दर जाहीर केल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, संचालक मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
कारखान्याचा वजनकाटा अत्यंत चोख असून, १००० किलोचाच एक टन मोजला जातो. ज्या काट्यावरून ऊस आत येतो, त्याच काट्यावरून साखर वजन करून बाहेर पाठवली जाते, अशी पारदर्शक व्यवस्था कारखान्यात आहे. यंदाच्या हंगामात कारखान्याने एका दिवसात ९,५६४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. संचालक मंडळाने यंदा १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, ते पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्याला गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने केले आहे.
या बैठकीस अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर, संचालक कैलास गावडे, ॲड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, निलेश टिळेकर, संतोष मासाळ, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, हणमंत घोळवे, सत्यवान चव्हाण आणि कार्यकारी संचालक अशोक जाधव उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असल्यामुळेच श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना योग्य दिशेने व प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे.
-पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती कारखाना, भवानीनगर.





