धुळ्यात उष्णतेची लाट; हंगामात सर्वाधिक 44.3 अंश तापमानाची नोंद

धुळे – शहरासह जिल्हावासीयांना सोमवारी सर्वात उष्ण ४४.४ अंश तापमानाने चटका बसला. या वर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३.३ अंशावर पोहचला होता. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे.
जिल्ह्यात उष्णतेची लाटच सुरू असताना सोमवारी दुपारी सर्वाधिक ४४.३ अंशांची नोंद होऊन नंतर पारा ४३.३ अंशावर स्थिरावला. यामुळे तीव्र उन्हाचे चटके व उकाड्याने नागरिक पुरते हैराण झाले. शहरात उघड्यावर फळे, भाजीपाला विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना उन्हाचे सर्वाधिक चटके सहन करावे लागले.
दुपारी तीव्र ऊन व उष्ण वारे असह्य होत असल्याने त्यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. रविवारच्या सुटीनंतर सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने देखील सायंकाळपर्यंत व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळपर्यंत उष्ण झळा सुरू होत्या.





