भारतीय खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा सुपूत्र काळाच्या पडद्याआड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Jayant Narlikar : जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पहाटे झोपतेच पुण्यातील राहत्या घरात निधन झाले. त्यांच्या जाण्याने विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे. जयंत नारळीकर यांनी खगोल संशोशन करत अनेक थिअरी मांडल्या. जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर (वय ८६) यांचे पुण्यातील निवासस्थानी आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायात शोककळा पसरली आहे.
भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.
डॉ. नारळीकर यांच्या कन्या श्रीमती गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सांत्वना दिली. डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणाना दिले. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमुल्य योगदान दिले. गणितज्ज्ञ वडीलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली.
तसेच भारतात परतल्यावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (IUCAA)’ “आयुका” या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेलाही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र अशी ख्याती मिळवून दिली. ‘बिग-बँग थिअरी’ वर काम करत असतानाच, त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.





