पुणे : पुण्यातील तरुणांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा वाढवण्यासाठी आणि नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), पुणे येथील Entrepreneurship Development Cell (EDC) तर्फे ‘विश्वाप्रेन्योर २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील ई-समिटचे आयोजन करण्यात आले आहे. १४ आणि १५ मार्च रोजी होणारा हा कार्यक्रम उद्योजकता, स्टार्टअप्स आणि नवकल्पनांच्या जगाला एकत्र आणणारा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. गेल्या १३ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या ‘विश्वाप्रेन्योर’ला (Vishwapreneur 2026) यंदा अधिक भव्य आणि प्रभावी स्वरूप देण्यात आले आहे. वानवरी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार, उद्योगतज्ज्ञ आणि नवउद्योजक सहभागी होणार आहेत. या ई-समिटमध्ये प्रेरणादायी व्याख्याने, विचारमंथनात्मक चर्चासत्रे, प्रात्यक्षिक कार्यशाळा, स्टार्टअप्ससोबत नेटवर्किंगच्या संधी तसेच अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे सहभागींच्या कल्पनांना दिशा मिळून उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमात तिसऱ्या पिढीतील सैन्य अधिकारी यशपाल सिंग मोर, ई-स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे लोकेश सुजी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी अध्यक्ष श्रीकांत वैद्य तसेच उद्योजक व नवोन्मेषक आयुष्मान पंडिता यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय वित्त, स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विपणन अशा विविध क्षेत्रांतील २० पेक्षा अधिक तज्ज्ञ या ई-समिटमध्ये सहभागी होणार आहेत. उद्योजकतेच्या नव्या संधी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी व नवउद्योजकांनी विश्वाप्रेन्योर २०२६’ ला नक्की भेट द्या. नोंदणीसाठी भेट द्या: https://vishwapreneur.co.in/