शिरूरमध्ये पावात आढळली घुशीची लेंडी; नागरिकांचा संताप, प्रशासनावर टीकेची झोड!

शिरूर : शिरूर शहरालगत रामलिंग रोडवरील सिरवी बंधू मिठाईवाले यांच्या स्वीटहोम बेकरीतून खरेदी केलेल्या पावाच्या लादीत घुशीची लेंडी आढळल्याने खळबळ उडाली आहे. 20 जुलै रोजी सतीष तागड यांनी खरेदी केलेल्या दोन पावाच्या लादींपैकी एकामध्ये ही घृणास्पद लेंडी सापडली. या धक्कादायक प्रकारामुळे त्यांनी बेकरीत धाव घेत ग्राहकांसमोर हा गंभीर प्रकार उघड केला.
सतीष यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली असती, तर लहान मुले किंवा आजारी व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून, अन्न सुरक्षा व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका होत आहे. नागरिकांचा आरोप आहे की, शिरूर शहर आणि तालुक्यातील बेकऱ्या, हॉटेल्समध्ये अस्वच्छता आणि बिनधास्त अन्नसाठवण सर्रास चालते. अन्न प्रशासनाची तपासणी केवळ कागदोपत्रीच मर्यादित असून, “दाखवा आणि बक्षीस मिळवा” धोरण उपहासास्पद ठरत आहे.
शिरूरमधील अनेक हॉटेल्स आणि बेकऱ्यांमध्ये शिळे, खराब पदार्थ ग्राहकांना दिले जात असल्याचा नागरिकांचा दावा आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि नियमित तपासणीचा अभाव यामुळे असे प्रकार घडतात. संतप्त नागरिकांनी सिरवी बंधू बेकरीवर तातडीने कठोर कारवाई आणि संपूर्ण तालुक्यातील बेकऱ्या, हॉटेल्सच्या अन्न सुरक्षेची तपासणी मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. याशिवाय, दुधाच्या भेसळीविरोधातही प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचा प्रशासनाला इशारा
अन्न सुरक्षेसाठी तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. ही घटना शिरूरसारख्या वाढत्या शहरातील अन्न सुरक्षेचा ढासळलेला स्तर आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकते. आता अन्न सुरक्षा विभाग आणि तालुका प्रशासन यावर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





