शिरूर तालुक्यात शिक्षक बदल्यांचा सावळा गोंधळ; खोट्या वैद्यकीय दाखल्यांचा धक्कादायक खुलासा!

शिरूर – राज्यात शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया जोरात सुरू आहे. पुणे जिल्हा परिषदेतही तालुकाअंतर्गत आणि तालुकाबाह्य बदल्यांचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, शिरूर तालुक्यात या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि गैरप्रकार उघडकीस आले आहेत. खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे काही शिक्षकांनी मनपसंत ठिकाणी बदल्या करून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, बदली प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिक्षण विभागाने शिक्षक बदल्यांसाठी चार संवर्ग निश्चित केले आहेत:
संवर्ग १: ५३ वर्षांवरील, गंभीर आजारांनी ग्रस्त, विधवा आणि परितक्त्या यांना प्राधान्य.
संवर्ग २: पती-पत्नी एकत्रीकरण आणि ५३ वर्षांवरील शिक्षक.
संवर्ग ३: अवघड क्षेत्रात सेवा देणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य.
संवर्ग ४: उर्वरित सर्व शिक्षक.
शिरूर तालुक्यात काही शिक्षकांनी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करून बदल्या मिळवल्याचा आरोप आहे. यात काहींनी मुलगा, पती, आई-वडील किंवा स्वतः आजारी असल्याचे दाखवले, तर काहींनी पती/पत्नी आजारी असल्याचे कारण पुढे केले. विशेष म्हणजे, आजारी असल्याचे दाखवणारे काही शिक्षक कार्यालयात नियमित कामावर हजर असल्याने संशय निर्माण झाला आहे. “आजारी शिक्षक जर कामावर हजर असतील, तर ते खरोखर आजारी आहेत का?” असा प्रश्न शिक्षक वर्गातून उपस्थित होत आहे.
“खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या शिक्षकांना अन्याय सहन करावा लागत आहे, तर खोटी कागदपत्रे सादर करणारे शिक्षक मनपसंत ठिकाणी बदली मिळवत आहेत,” अशी खंत शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. या गैरप्रकारांमुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, चुकीची माहिती सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शिक्षक बदली प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने वैद्यकीय दाखल्यांची कसून चौकशी करावी, अशी आग्रही मागणी शिक्षक वर्गाने केली आहे.





