पिंपरी | माहिती तंत्रज्ञान उद्यानात राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा

हिंजवडी, ( वार्ताहर ) – भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीचे औचित्य साधून हिंजवडीच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये हिंजवडी-माण हद्दीत राजीव गांधी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा,
अशी मागणी पुणे जिल्हा युवक कॅाग्रेंसचे अध्यक्ष महेश टापरे व युवकचे मुळशी तालुका अध्यक्ष संदीप साठे यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी डॅा.अर्चना पठारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगात भारत महासत्ताक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ज्या राजीव गांधींनी माहिती तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करत देशात माहिती तंत्रज्ञान आणले.
ज्यांच्या नावाने हिंजवडी माण उद्योगनगरीमध्ये देशातील सर्वात मोठे माहिती तंत्रज्ञान उद्यान वसविले.
त्या राजीव गांधी माहीती तंत्रज्ञान उद्यानात संगणक क्रांतीचे जनक राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.
यावेळी मुळशी युवकचे कार्याध्यक्ष समिर जाधव व पुणे जिल्हा युवक कॅाग्रेंसचे उपाध्यक्ष संतोष मळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पंचवीस वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून “ज्यांच्या नावाने हे माहिती तंत्रज्ञान उद्यान सुरू करण्यात आले. त्यांचे संगणक क्रांती मधील क्रांतिकारी योगदान पाहून त्यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ही इच्छा अनेक दिवसांपासून मनात होती.
पुणे जिल्हा युवक कॅाग्रेंसचे अध्यक्ष महेश टापरे यांच्या पुढाकाराने आज या संकल्पनेच्या मागणीला मूर्त स्वरुप मिळाले.
राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तत्काळ अंमलबजावणी करावी. यासाठी आमदार संग्राम थोपटे व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही पाठपुरावा करणार आहोत. – संदीप साठे (अध्यक्ष, मुळशी तालुका युवक कॅाग्रेंस )





