Hindu temple collapsed : दक्षिण आफ्रिकेतील चार मजली हिंदू मंदिर कोसळले, ४ जण ठार

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेतील चार मजली हिंदू मंदिर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ५२ वर्षीय भारतीय वंशाच्या एका व्यक्तीबरोबर एकूण चौघाजणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतल क्वा झुलू नताल प्रांतात ही दुर्घटना झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूर्वी डर्बन नावाने ओळखले जात असलेल्या एथेकविनीच्या उत्तरेकडील रेडक्लिफ येथील एका उंच टेकडीवर वसलेल्या न्यू अहोबिलम संरक्षण मंदिराचा विस्तार केला जात असताना, शुक्रवारी इमारतीचा एक भाग कोसळला. येथील मंदिराच्या इमारतीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली.
नेमके किती कामगार आणि मंदिर प्रशासनाचे अधिकारी गाडले गेले, याचा नेमका तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. पण अनेक टन ढिगाऱ्याखाली आणखी अनेक कामगार आणि अधिकारी अडकले असावेत असा संशय आहे.
शुक्रवारी एक बांधकाम कामगार आणि एका भाविकासह दोन जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आला. तर बचाव पथकांनी आणखी मृतदेह बाहेर काढल्यानंतर शनिवारी मृतांचा आकडा चारवर पोहोचला.
मृत्यू झालेल्या चार जणांपैकी एकाची ओळख मंदिराच्या ट्रस्टचे कार्यकारी सदस्य आणि बांधकाम प्रकल्पाचे व्यवस्थापक विक्की जयराज पांडे अशी झाली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी मंदिराच्या स्थापनेपासूनच पांडे मंदिराच्या विकासात गुंतलेले होते. अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
हे मंदिर भारतामधून आणलेल्या आणि जागेवरच उत्खनन केलेल्या खडकांचा वापर करून गुहेसारखे दिसेल अशा प्रकारे डिझाइन केले होते, आणि त्यात भगवान नृसिंहाची जगातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक मूर्ती असेल,असा दावा ही वास्तू बांधणाऱ्या कुटुंबाने केला होता.





