Gajanan Kale : ‘कोल्हापूरच्या हृतिक रोशनची फर्स्ट कॉपी’; मनसेने कृष्णराज महाडिकांना डिवचलं
Gajanan Kale : या प्रकरणावरून मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर निशाणा साधला.

Gajanan Kale : मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या फोटोप्रकरणावरून भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोपावरुन चांगलीच जुंपली आहे. प्राचार्यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो शेजारी लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्याने हा फोटो भिंतीवरून काढल्याने वादाला तोंड फुटले. हा वादा शमण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल झाला आहे. (Gajanan Kale)
या प्रकरणावरून मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, माहीममध्ये मंगळवारी झालेल्या मनसे-भाजप संघर्षानंतरही दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी कृष्णराज महाडिक यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी महाडिक आणि भाजयुमो कार्यकर्त्यांना माहीम परिसरातच ताब्यात घेतले. (Gajanan Kale)
कृष्णाराज महाडिक यांचा आरोप (Gajanan Kale)
यानंतर कृष्णराज महाडिक यांनी मनसे कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. “आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत होतो, पण मनसेचे ‘गुंड’ आमच्या अंगावर धावून आले. आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. आमच्या मुलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावल्या. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले, पण मनसेच्या गुंडांना नाही. त्यांनाही ताब्यात घ्यावे,” अशी मागणी त्यांनी केली होती. महाडिक यांच्या या आरोपांनंतर वाद आणखी चिघळला. मनसे नेते गजानन काळे यांनी त्यांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. “कोल्हापूरच्या हृतिक रोशनची फर्स्ट कॉपी, तीही पायरेटेड… आंदोलन करतायेत ते पण तीन किलोमीटर लांब! ते आंदोलनही फसलं, मग हे आम्हाला चोर म्हणणार,” अशा शब्दांत काळे यांनी महाडिक यांच्यावर टीका केली.
गजानन काळेंचा सवाल (Gajanan Kale)
गजानन काळे यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. “अमित ठाकरे जर कालचं पोरं असेल तर रविंद्र चव्हाण हा बनेल प्रवक्ता का बोलतोय? बरं, आंदोलन होतंय आणि रविंद्र चव्हाणांनाच माहित नाही? अमित ठाकरे महाविद्यालयात जाऊन प्रश्न सोडवतायेत, हे झोंबतंय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण वादामुळे भाजप आणि मनसेमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका सुरूच आहे.





