Amit Thackeray : पंतप्रधान मोदींचा फोटो हटवताच अमित ठाकरेंसह 25 जणांवर गुन्हा दाखल
Amit Thackeray : मनसेच्या आंदोलनानंतर उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालायस भेट दिली

Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध पुण्यातील चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कँटीनची पाहणी केली. यावेळी शासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे दिसल्यानंतर अमित ठाकरे चांगलेच संतापले होते.
यादरम्यान, ‘काढ रे तो फोटो, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्याला दिले. कार्यकर्त्याने लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांशेजारी असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो काढला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
याप्रकरणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चतुश्रुंगी पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अमित ठाकरे यांच्यासह यांच्यासह २५ जणांविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल केला. प्राचार्य डाॅ. राजेंद्र काशीराम पाटील (वय ५२, रा. भुसारी काॅलनी, कोथरूड) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोदींचा फोटो हटवला आणि धमकी दिल्याचा आरोप
‘अमित ठाकरे हे २० ते २५ पदाधिकाऱ्यांसह सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात आले. त्यांनी डाॅ. राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयात प्रवेश केला. यादरम्यान अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील आणि मेसमधील, स्वच्छतागृहातील अस्वच्छता याबाबत आम्हाला जाब विचारून मोठा आवाजात धमकीवजा सूचना देत होते.
तसेच कार्यालयात लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आवारात घोषणाबाजी केली,’ असा आरोप प्राचार्य डाॅ. पाटील यांनी फिर्यादीत केला.
याशिवाय आम्ही दिलेल्या सुचनांची पुढील आठ दिवसात पूर्तता केली नाही तर, आम्ही पुन्हा तुमच्या कार्यालयात येऊन आंदोलन करु अशी धमकी दिली, अशीही तक्रार प्राचार्यांनी दिली.
हेही वाचा:





