Pune Gramin : मोशीच्या शाळेत भरला बाल वारकऱ्यांचा मेळा ! पालखी सोहळ्यात विठ्ठल भक्तीने दुमदुमला परिसर

चिंबळी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मोशी येथील प्राथमिक विद्यालयात पालखी सोहळ्याचे भक्तिमय आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान करत, कपाळी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि हातात टाळ घेऊन ‘विठ्ठल-विठ्ठल’चा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. या अनोख्या सोहळ्याने विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा परिचय करून दिला.
भक्तिमय वातावरणात पालखी पूजन
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता गवारे आणि माध्यमिक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका गडहिरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुलांनी वारकरी वेश परिधान केला, तर मुलींनी नऊवारी साड्या नेसून डोक्यावर तुळशीची पाने घेऊन सोहळ्यात रंग भरला. उपशिक्षिका सविता गाडेकर यांनी पंढरपूरच्या महिम्याची माहिती सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना सांगितली, ज्यामुळे त्यांना वारकरी परंपरेची ओळख झाली.
रिंगण, भजने आणि फुगडीने रंगला परिसर
‘ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम’ असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात रिंगण घालून फेरी काढली. ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’, ‘विठूचा गजर’, ‘मनात भरली पंढरी’ अशी भक्तिमय भजने गात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन टाकले. श्री. नागेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीही पालखीचे स्वागत आणि पूजन केले. विशेष म्हणजे, विद्यार्थिनी आणि महिला शिक्षकांनी फुगडी घालून कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विकास गायकवाड यांनी केले, तसेच त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. संदीप बोते, काजल बोराटे, आशिष शिंदे आणि लतिका तळपे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या भक्तिमय सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जागरूकता वाढवण्याबरोबरच त्यांना आनंदाचा अनुभव दिला





