Equity mutual funds: जागतिक तणावांचा थेट परिणाम, इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक 22% ने घसरली!

मुंबई- जागतिक अस्थिर आर्थिक परिस्थितीचा परिणाम जागतिक शेअर बाजार बरोबरच भारतीय शेअर बाजारावर होत आहे. अशा परिस्थितीत शेअर संदर्भातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सातत्याने कमी होत आहे. मे महिन्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात केवळ 19 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. हा 13 महिन्यातील निचांक आहे.
या क्षेत्रातील गुंतवणूक केवळ कमी झालेली नाही तर आहे ती गुंतवणूक काढून घेऊन गुंतवणूकदार नफा काढून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या पाच महिन्यापासून इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकतर्फी कमी होत आहे.
त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यामध्ये झालेली गुंतवणूक 22 टक्क्यांनी कमी झाली आहे. एप्रिल महिन्यात 24,269 कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी म्युच्युअल फंडात झाली होती. मात्र एकूण म्युच्युअल फंडात होत असलेली गुंतवणूक वाढत असून ती सलग 51 व्या आठवड्यातही वाढली असल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संघटनेने म्हटले आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सातत्याने कमी होत असली तरीही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून होत असलेले गुंतवणूक मात्र सातत्याने वाढत आहे. मे महिन्यामध्ये एसआयपीच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक 26,668 कोटी रुपये इतकी झाली आहे. एप्रिल महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून झालेल्या 26, 632 कोटी रुपये गुंतवणुकीपेक्षा मे महिन्यात झालेली गुंतवणूक जास्त आहे.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सातत्याने वाढत असल्यामुळे मे महिन्यात म्युच्युअल फंडाच्या नियंत्रणाखाली असलेली एकूण मालमत्ता 72.2 लाख कोटी रुपये झाली आहे. एप्रिल महिन्यात ही मालमत्ता 70 लाख कोटी रुपये इतकी होती.
आयआयटी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिंदरपाल सिंग यांनी सांगितले की, मे महिन्यामध्ये भारत- पाक तणाव वाढला होता. त्याचबरोबर जागतिक व्यापार युद्ध सुरू झाले होते. अशा परिस्थितीत इक्विटी म्युच्युअल फंडाबाबत गुंतवणूकदार सावध आहेत.




