China : सैन्यातून थेट बाहेरचा रस्ता.! चीनने नौदल प्रमुख आणि अणुशास्त्रज्ञ हटवले

China – चीनच्या शक्तिशाली संरक्षण आणि सुरक्षा विषयक संस्थांमधील शुद्धीकरण प्रक्रिया सुरूच राहिली असून शुक्रवारी राष्ट्रीय कायदेमंडळातून वरिष्ठ जनरल, नौदल प्रमुख आणि अणुशास्त्रज्ञांसह उच्च लष्करी अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले.
जनरल मियाओ हुआ यांच्यासह पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस अॅडमिरल ली हंजुन आणि चायना नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनचे डेप्युटी चीफ इंजिनिअर लिऊ शिपेंग यांना नॅशनल पीपल्स काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले आहे.
दोघांचेही कायदेमंडळाचे सदस्यत्व काढून घेण्यात आले आहे. चिनी सैन्याच्या एकूण उच्च कमांड असलेल्या सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या सदस्यपदावरून सर्वोच्च जनरल मियाओ हुआ यांना काढून टाकण्याचा निर्णय आज झालेल्या एनपीसीच्या स्थायी समितीने मतदाननंतर घेतला.
चिनी लष्करी पदानुक्रमातील सर्वात तरुण जनरल मियाओ यांच्यावर गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून शिस्तीच्या गंभीर उल्लंघनाची चौकशी सुरू आहे. शी जिनपिंग यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर मियाओ यांची कारकीर्द वेगाने पुढे गेली, त्यांना चिनी नौदलात राजकीय कमिशनर म्हणून काम मिळाले आणि अखेर ते पीएलएचे सर्वात तरुण अॅडमिरल बनले.
त्यांच्यावर शिस्तभंगाचे गंभीर आरोप आहेत. शी जिनपिंग यांनी सत्ता हाती घेतल्यापासून भ्रष्टाचार आणि अनुशासनहीनतेसाठी डझनभर वरिष्ठ जनरलना काढून टाकले आहे. यामध्ये दोन संरक्षण मंत्र्यांचाही समावेश आहे.





