Nagar | गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने देवगडला भाविकांचा महापूर

नेवासा, (प्रतिनिधी) – गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या कीर्तन सोहळ्याला उच्चांकी गर्दी दिसून आली. सुमारे दोन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. गुरूंचा महिमा व लीला अगाध असून संत हे जगाचे कृपाळू मायबाप आहे. गुरूंबद्दल असलेल्या भक्तीभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा, असे आवाहन भास्करगिरी महाराजांनी केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रय, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. देवगड येथील ज्ञानसागर सभामंडपामध्ये भास्करगिरी बाबा यांचे गुरूशिष्य परंपरा व गुरू महिमा यावर कीर्तन झाले.
कीर्तन सोहळयाच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भास्करगिरी बाबांसह उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे संतपूजन केले.कीर्तनानंतर महाआरती करण्यात आली. महाआरतीच्या प्रसंगी देवगडचे दत्त मंदिर प्रांगण हजारो भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मंदिर प्रांगणात विविध दुकाने मोठ्या प्रमाणात थाटल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यावेळी झालेल्या कीर्तनप्रसंगी संतसेवक हभप दिनकर महाराज मते, गुरुवर्य बाबांच्या मातोश्री सरुआई पाटील, स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते, युवा नेते उदयन गडाख, नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, गायनाचार्य पंढरीनाथ महाराज मिस्तरी, बाबासाहेब महाराज सातपुते,
संतसेवक बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, नामदेव महाराज कंधारकर, छत्रपती संभाजीनगर येथील भक्त मंडळाचे सेवेकरी गायक रामजी विधाते, बजरंग विधाते, मुरमे गावचे सरपंच अजय साबळे, नगर भक्त मंडळाचे सेवेकरी यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना गंगापूर येथील साबणे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या हजारो भाविकांनी महंत भास्करगिरींचे दर्शन घेतले. यावेळी भास्कगिरी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी भाविकांशी सुसंवाद साधला. देवगडचे मुख्य प्रवेशद्वार, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर याठिकाणी भाविकांची झालेली गर्दी लक्षणीय होती.





