Devgad : कार्तिक पौर्णिमेला देवगडमध्ये भक्तांची मांदियाळी; तीन लाख भाविकांनी घेतले दत्तप्रभूंचे दर्शन
Devgad : कार्तिक पौर्णिमेनिमित्त नेवासा येथील देवगडमध्ये सुमारे तीन लाख भाविकांनी दत्तात्रय आणि कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. महाप्रसाद, भजन आणि जागराने परिसर भक्तिमय झाला.

Devgad : कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पीठात भाविकांची मोठी गर्दी झाली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रय आणि कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. जयघोष, आरती आणि भजनांमुळे संपूर्ण देवगड परिसर भक्तिमय झाला होता.
देवगड पीठाचे प्रमुख महंत हभप भास्करगिरीजी बाबा आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी भाविकांचे स्वागत करून त्यांना आशीर्वाद दिले. मंदिर परिसरात कार्तिक स्वामींची विधिवत पूजा करण्यात आली. आरतीच्या वेळी भाविकांनी केलेल्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
गंगापूर तालुक्यातील कनकोरी, गळनिंब आणि जामगाव येथील ग्रामस्थ व भक्त मंडळांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री नेवरगाव येथील भजनी मंडळाचा जागर झाला. भजन, कीर्तन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात भाविक रात्रभर भक्तिरसात तल्लीन झाले.
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक नियंत्रण आणि पार्किंगचे नियोजन केल्यामुळे यात्रा शांततेत पार पडली.





