Raj Thackeray : “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते…”; राज ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे?
Raj Thackeray : अमित शाह यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे का? असा सवाल उपस्थित

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणाचेही नाव न घेता राज ठाकरे यांनी “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते… तूर्तास एवढेच…” असे लिहिले आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा टीकेचा रोख कोणाकडे याची चर्चा सुरु आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात हिंदी दिवस आणि सहावे अखिल राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात महाराष्ट्र बहुभाषिक असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या टीकेचा रोख अमित शाहांच्या अध्यक्षतेखालील हिंदी संमेलनाकडे आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीसह सर्व भारतीय भाषांच्या सन्मानाची भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरे नेमका कोणाला इशारा देत आहेत, यावरून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राच्या भूमीवर मराठीसोबतच कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली यांसह अनेक भाषांचा विकास झाला असून या सर्व भाषांचा सन्मान केला जात असल्याचे अमित शाह यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य देशात दुसरे नाही, असेही त्यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यावरच राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने त्यांच्या वक्तव्याचा नेमका संदर्भ अद्याप स्पष्ट झालेला नाही. Raj Thackeray
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा उल्लेख
अमित शाह यांनी यावेळी मराठी भाषेच्या सन्मानाचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची बहुभाषिक संस्कृती ही त्याची विशेष ओळख असल्याचे सांगताना त्यांनी मराठीसह कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड आणि वारली अशा विविध भाषांचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील या भाषिक वैविध्याचा सन्मान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजभाषा आणि मातृभाषेच्या महत्त्वावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मातृभाषेचा तसेच राजभाषेचा सन्मान करण्यावर सातत्याने भर देत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना पुढे नेताना मातृभाषेसोबत किमान आणखी एक भारतीय भाषा शिकण्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी ही आपली मातृभाषा असून इतर भारतीय भाषा या आपल्यासाठी मावशीसारख्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाषिक सलोख्याची भूमिका मांडली होती. Raj Thackeray
हेही वाचा:
Jackie Shroff : ….तर कदाचित ती वाचली असती; जॅकी श्रॅाफ यांनी सांगितली आईच्या निधनाची कटू आठवण





