Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये फ्रान्सच्या लष्कराचेही पथक

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणार् या लष्कराच्या पथसंचलनामध्ये यंदा फ्रान्सच्या लष्कराची तुकडीही सहभागी होणार आहे. या संचलनामध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सच्या लष्कराच्या तुकडीला निमंत्रण देण्यात आले असून,
या संचलनात सहभागी होण्याचा मान मिळाल्याबद्दल फ्रान्सच्या लष्कराला अभिमान वाटतो आहे, अशी प्रतिक्रीया फ्रेंच फॉरेन लीजनचे कॅप्टन लॉईक अलेक्झांड्रे यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या समारंभात भारतीय लष्कराची तुकडी सहभागी झाली होती. आता फ्रान्सच्या लष्कराची तुकडी भारतातील समारंभामध्ये सहभागी होणार आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रेंच नेता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही सहावी घटना असेल.





