पुणे जिल्हा | अजित पवार व अशोक पवार यांच्यातील संघर्ष उफाळला

वाघोली,(प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या लोकसंख्येने मोठ्या असणार्या वाघोली व लोहगाव गावासाठी पिण्याची पाण्याची योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.
राज्य शासनाने याची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेला भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेत योजनेत समावेश करावा अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने लोहगाव वाघोलीसाठी पाण्याची पाण्याची योजना मंजूर करून त्यात 283 कोटी नियोजित आराखडा केला.
लोहगाव येथील गजानन मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोहगाव वाघोली परिसरातील नागरिकांसाठी समान पाणीपुरवठा योजनेसाठी 230 कोटी रुपये मंजूर झाल्याने या योजनेचे भूमिपूजन 11 फेब्रुवारी 2024 रोजी सुमारास झाले होते.
हा कार्यक्रम आमदार सुनील टिंगरे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रम पत्रिकेत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे देखील नाव होते. भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली.
यानंतर 17 जुलै रोजी सुयोग निसर्ग सोसायटीजवळ कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा लोहगाव-वाघोली भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन समारंभ शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन केल्यानंतर आमदार अशोक पवार यांनी पुन्हा वाघोली येथे भूमिपूजन केल्याने आमदार अशोक पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यातील संघर्षाची चर्चा लोहगाव, वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने हे भूमिपूजन संपन्न झाले अशी चर्चा वाघोलीत मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. लोहगाव वाघोली पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी उपोषण देखील केले होते. पाणीपुरवठ्याचा प्रश्न तसेच इतर प्रश्न त्यांनी विधानसभेच्या पटलावर देखील मांडले होते.
आमदार अशोक पवार व वाघोलीतील सर्वपक्षीय नेते मंडळींचा वाघोलीच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा देखील आहे. वाघोलीत संपन्न झालेल्या भूमिपूजनामुळे दोनदा भूमिपूजन का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
काही ठराविक कार्यकर्ते व काही ठराविक सोसायटीतील नागरिक या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. अनेक आमदार अशोक पवार यांचे निकटवर्तीय या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे.
वाघोलीत होणार तिसर्यांदा भूमिपूजन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोहगाव वाघोली पाणीपुरवठा योजना व इतर विकास कामांच्या भूमिपूजन शासनाच्या वतीने संपन्न होण्यासाठी कार्यकर्ते तयारीला लागले असून यासाठी मंत्री स्तरावर भेटीगाठी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी तिसर्यांदा भूमिपूजन संपन्न झाले तर नवल वाटून घेऊ नये.



