पुणे जिल्हा | वाघोली येथे लवकरच सुरू होणार सिव्हिल हॉस्पीटल

वाघोली, (प्रतिनिधी)- वाघोली येथील गायरान जमीन गट नं. 1119 व 1123 मधील एकूण 3. 5 एकर जागेमध्ये सिव्हिल हॉस्पीटल व ट्रामा सेंटर सुरु करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली शासन स्तरावर यासाठी सद्या प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा सुरू असून लवकरच हॉस्पीटल सुरू होणार असल्याची माहिती दाभाडे यांनी दिली.
दाभाडे यांनी सांगितले की, वाघोली येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.
वाघोलीतील जिल्हा परिषदेच्या मालकीची तीन एकर 17 गुंठे जमीन असून ही जमीन ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे हस्तांतरित करण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे.
दि. 28 फेब्रुवारी रोजी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सुचविलेल्या या प्रस्तावाला कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी अनुमोदन दिले आहे. आता, जागा असतानाचाहा प्रस्ताव शिफारस करून ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता.
लवकरच भूमिपूजन होणार…
वाघोली येथील गट नं. 1119 आणि 1123मधील अनुक्रमे 68 आर व 69 आर जागा ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर साठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पुणे यांचे नावे हस्तांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.
त्याअनुषंगाने ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट बांधकामाच्या प्रयोजनार्थ, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पुणे यांचे नावे हस्तांतरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
असा आदेश ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी सागर मनोरे यांनी दि. 27 सप्टेंबर रोजी काढला असल्याची माहिती रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे.
दाभाडे यांच्या भेटीगाठींना वेग…
वाघोली येथे सर्व सोईयुक्त हॉस्पिटल व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग यांचेकडे रामभाऊ दाभाडे यांचा पाठपुरावा तसेच भेटीगाठींचा वेग होता.
आमदार राहुल कुल, प्रदीप कंद यांनी देखील या प्रकरणी पाठपुरावा केला असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.





