EMI Scam: स्वस्तात मिळणारा फोन पडू शकतो महागात; ‘ईएमआय स्कॅम’चा फटका बसण्याची शक्यता
EMI Scam: स्वस्त फोनच्या मोहात मोठी रक्कम अडकण्याचा धोका

पिंपरी – महागातला स्मार्टफोन बाजारभावापेक्षा दहा ते पंधरा हजार रुपये स्वस्त मिळत असल्याचे सांगितले जाते. ग्राहकही या सवलतीला भुलतात. सीलबंद फोन असल्याने विश्वास बसतो. रोख पैसे देऊन व्यवहार केला जातो.
मात्र, काही काळानंतर फोन वापरताना अडचणी येऊ शकतात. हप्ते थकल्यामुळे फोनवर निर्बंध येण्याची शक्यता असते. त्यानंतर फोन विकणारी व्यक्ती संपर्काबाहेर जाऊ शकते. त्यामुळे स्वस्त फोनच्या मोहात मोठी रक्कम अडकण्याचा धोका आहे.
शहरातील तरुणाईकडून महागड्या स्मार्टफोनची मोठी मागणी आहे. नवीन मॉडेल खरेदी करण्याकडे तरुणांचा कल आहे. याच मागणीचा गैरफायदा घेत बाजारभावापेक्षा कमी किमतीत फोन देण्याची ऑफर दिली जाते. काही वेळा फोन सीलबंद असतो. बॉक्स आणि इतर साहित्यही दिले जाते. त्यामुळे ग्राहकाला व्यवहाराबाबत संशय येत नाही.
मात्र, फोनची मूळ खरेदी कशी झाली आहे, हे तपासणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये फोन कर्ज किंवा ईएमआयवर खरेदी केलेला असू शकतो. मूळ खरेदीदार तो फोन पुढे रोखीने दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो. त्यामुळे फोन वापरणाऱ्या व्यक्तीला मूळ आर्थिक व्यवहाराची पूर्ण माहिती नसते.
सुरुवातीला काही हप्ते भरले जातात. फोन व्यवस्थित सुरू राहतो. त्यामुळे नवीन ग्राहक निश्चिंत होतो. पुढे हप्ते थकले तर संबंधित फायनान्स करारातील अटी लागू होऊ शकतात. काही प्रकरणांत डिव्हाइसवर निर्बंध येऊ शकतात. अशा वेळी पैसे देऊन फोन घेणारा ग्राहक अडचणीत येतो.
विक्रेता संपर्काबाहेर गेल्यास वाढते अडचण
फोनमध्ये अडचण आल्यानंतर ग्राहक विक्रेत्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मोबाइल बंद लागतो. दिलेला पत्ता चुकीचा असण्याची शक्यता असते. व्यवहाराची पावती नसल्यास ग्राहकाची अडचण वाढते. रोख व्यवहारामुळे पैसे दिल्याचा ठोस पुरावाही राहत नाही.
सीलबंद बॉक्स पाहून व्यवहार करू नका
सीलबंद बॉक्स म्हणजे व्यवहार सुरक्षित आहे, असे समजू नये. मोबाइलचे मूळ बिल तपासावे. बिलावरील माहिती पाहावी. बिलावरील आयएमईआय क्रमांक आणि फोनमधील आयएमईआय क्रमांक जुळतो का, हे तपासावे. वॉरंटीची माहिती घ्यावी. फोन कोणाच्या नावावर खरेदी झाला आहे, हे जाणून घ्यावे.
दहा हजारांची बचत; लाखोंचा धोका नको
महागडा फोन बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत मिळत असेल तर त्यामागील कारण तपासणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीकडून घाईघाईने व्यवहार करू नये. सोशल मीडिया किंवा ऑनलाइन जाहिरातीतील स्वस्त फोनच्या ऑफरचीही पडताळणी करावी.
‘स्वस्त फोन’ खरेदीपूर्वी ही काळजी घ्या
- मूळ बिल तपासा : बिल कोणाच्या नावावर आहे, हे पाहावे.
- आयएमईआय जुळवा : बिलावरील आणि फोनमधील आयएमईआय क्रमांक समान आहे का, हे तपासावे.
- ईएमआयची माहिती घ्या : फोन कर्ज किंवा हप्त्यावर घेतला आहे का, याची उपलब्ध कागदपत्रांवरून खात्री करावी.
- विक्रेत्याची ओळख तपासा : अनोळखी व्यक्तीकडून व्यवहार करताना ओळखपत्र पाहावे.
- व्यवहाराचा पुरावा ठेवा : रोख व्यवहाराऐवजी व्यवहाराचा पुरावा उपलब्ध राहील, अशी पद्धत वापरावी.
- अति स्वस्ताईपासून सावध राहा : बाजारभावापेक्षा मोठी सवलत मिळत असल्यास व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करावी.





