Supriya Pathare : एका चुकीची मोठी किंमत मोजली; 3 महिने व्हिलचेअरवर, सुप्रिया पाठारेंनी सांगितला अपघाताचा थरारक अनुभव
Supriya Pathare : एका मुलाखतीत अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताचा धक्कादायक अनुभव सांगितला.

Supriya Pathare : मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अचूक कॉमेडी टायमिंगने अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर त्यांनी मराठी मालिका, नाटक आणि विविध माध्यमांमध्ये अनेकविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. विनोदी भूमिकांसोबतच त्यांनी नकारात्मक व्यक्तिरेखाही तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत.
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सुप्रिया पाठारे यांनीही मोठ्या उत्साहात आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. याच पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताचा धक्कादायक अनुभव सांगितला. तसेच महिलांना महत्त्वाचे आवाहनही केले.
आपल्या अपघाताबद्दल बोलताना सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “माझ्या त्या एका चुकीमुळे मला इतका त्रास झालाय की, माझ्या एका पायाला तीन फ्रॅक्चर होते. माझा पायजमा अकडला आणि दुसरा पाय मी जेव्हा खाली केला तेव्हा तो पायजमा निघाला. मी उभी पडले. त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती आहे की, स्कूटरवर बसणार असाल तर आपल्याबरोबर जो माणूस असेल त्याला पकडा आणि उतरा.”
महिलांना आवाहन करताना सुप्रिया म्हणाल्या, “स्कूटरवरून उतरताना पायघोळ कपडे अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे शरारा, गरारा, पलाझो किंवा अशा प्रकारचे पायघोळ कपडे घालून स्कूटरवरून प्रवास करताना आणि उतरताना विशेष काळजी घ्या.” तसेच अभिनेत्रीने वय वाढल्यानंतर हाडांची काळजी घेण्याचे आवाहन केले.
याविषयी सांगितला सुप्रिया म्हणाल्या “पन्नाशीनंतर हाडं ठिसूळ होतात आणि त्यानंतर ती रिपेअर करणं खूप कठीण होतं. माझ्या बाबतीत हेअरलाइन क्रॅक होता, त्यामुळे मोठा धोका टळला. मात्र माझ्या आयुष्यातील तीन महिने मला व्हिलचेअरवर काढावे लागले. असा प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टींची काळजी घ्यावी.”
सुप्रिया पाठारे यांना डॉक्टरांनी सहा महिने बेडवरून हलता येणार नाही, असे सांगितले होते. मात्र बाप्पा आणि स्वामींच्या कृपेने अवघ्या तीन महिन्यांत त्या पुन्हा आपल्या पायावर उभ्या राहिल्या. या कठीण काळातून बाहेर पडताना मिळालेला अनुभव त्यांनी चाहत्यांसोबत शेअर करत सर्वांनाच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Satara: ‘शाहू सृष्टी’तून साताऱ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवा





