अहमदनगर – अपरात्रीचा वीजपुरवठा; आजोबा-नातवाचा बळी

शेवगाव – महावितरणच्या वीजपुरवठ्याचा सावळागोंधळ कमालीचा वाढला असून, पुरवठ्याच्या वेळकाळास बंधन राहिले नाही. शेतीपंपांना रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील वडुले खुर्द येथील आजोबा आणि नातवाचे विजेच्या धक्क्याने काल (सोमवार) बळी गेला आहे.
कांद्याच्या रोपाला पाणी देण्यासाठी गेलेल्या निवृत्ती टोपा आव्हाड (वय 78) व दीपक सोपान पाखरे (वय 26) असे या घटनेतील मृत आजोबा व नातवाचे नाव असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडुले खुर्दतील वस्तीवर राहणारे वृद्ध शेतकरी निवृत्ती आव्हाड रात्री वीजपुरवठा होत असल्याने कांद्याच्या रोपांना पाणी देण्यासाठी रात्री अडीचच्या सुमारास गेले होते. मात्र, तेथून गेलेल्या वायरमधील विद्युतप्रवाह जमिनीवर पडलेल्या तारेत उतरल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ते जोराने ओरडताच त्यांचा आवाज वस्तीवर गेला. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलीचा मुलगा दीपक पाखरे यास झोपेतून उठवून शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. वीजप्रवाहाची कल्पना न आल्याने तो तेथे जाऊन आजोबांना उठविण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यातच त्याचेही निधन झाले. नंतर परिसरातील ग्रामस्थ व कुटुंबातील व्यक्तींनी वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दोघांवरही शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत दीपक विवाहित असून, पाठीमागे पत्नी व मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, शेतीपंपांना रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अशा प्रकारे जोखीम पत्करावी लागत असल्यामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा हकनाक बळी गेल्याची संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात संध्याकाळच्यावेळेस वीज पुरवठा सुरू केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतपिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागते. रात्री वीजपुरवठा खंडीत झाल्याने दुर्दैवी घटना घडतात.





