Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या सुटकेनंतर फटाके फोडल्याने गुन्हा दाखल

Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 223 नुसार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी हिवाळी हंगामात वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने 16 सप्टेंबर 2024 रोजी दिल्लीत फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्याच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा करण्यासाठी फटाके फोडले. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टीचे दिल्लीत प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, आपचे नेते दिवाळी किंवा हिंदू धर्माच्या कोणत्याही सणावर फटाके बंदीची घोषणा करतात. आता दिल्लीचे मंत्री आणि आप नेते गोपाल राय यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी.
परवा त्यांनी फेब्रुवारी 2025 पर्यंत फटाक्यांवर बंदी घालण्याचे विधान केले होते. आणि काल मुख्यमंत्र्यांसमोर फटाके फोडण्यात आले. सर्व निर्बंध फक्त सनातन धर्मासाठी आहेत.केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी अटक केली होती.
त्यावेळी ते मनी लाँड्रिंग प्रकरणात आधीच तिहार तुरुंगात होते. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानातून अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आधीच जामीन मिळाला होता. शुक्रवारी त्यांना सीबीआय भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मिळाला.





