पन्नास लाखांच्या फसवणूक प्रकरणी तीन जणांवर गुन्हा

कराड -प्राइमबुल्स मल्टिकॉन या कंपनीत पैसे गुंतवल्यास महिन्याला चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून, अनेकांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, हणमंत भगवान लोखंडे (रा. बहे-तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली), प्रमोद बाळू लोंढे (रा. मुंढे, ता. कराड) आणि प्रकाश सदाशिव नायकवडी (रा. विंग, ता. कराड) यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2022 ते मे 2023 या कालावधीत घडली. याप्रकरणी शहाजी गणपती पाटील (रा. बहे-तांबवे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मी प्राइमबुल्स मल्टिकॉन कंपनीत डायरेक्टर आहे. तुम्ही काही रक्कम गुंतवल्यास, तुम्हाला चार टक्के व्याजाने परतावा देतो, असे शहाजी पाटील यांना त्यांच्या गावातील हणमंत लोखंडे याने सांगितले. तुम्ही जी रक्कम गुंतवाल, त्याचे मला कंपनीकडून दोन टक्के कमिशन मिळते. तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील, तर तुम्ही कर्ज काढून पैसे भरा. तुम्हाला फायदा होईल. गुंतवणूक केलेल्या रकमेचे एक वर्षानंतरचे चेक तुम्हाला देणार असल्याने, मूळ रक्कम परत मिळण्याची खात्री आहे, असेही लोखंडेने सांगितले. त्यानंतर लोखंडे हा शहाजी पाटील यांना घेऊन मलकापूर, ता. कराड येथे कृष्णा हॉस्पिटलसमोर कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला. तेथे लोखंडेने पाटील यांची प्रमोद लोंढे व प्रकाश गायकवाड यांच्याशी भेट घडवली. केवळ महिनाभरात चार टक्के व्याजाने परतावा मिळणार असून, त्याबाबत निर्धास्त राहा, असे त्या दोघांनीही पाटील यांना सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी पाच लाख रुपये कर्ज काढले.
त्यातील दोन लाख दहा हजार रुपये प्रमोद लोंढे याच्या बॅंक खात्यावर पाठवले. लोखंडे याने या रकमेचा प्रमोद लोंढे याच्या खात्यावरील चेक पाटील यांना दिला. त्यानंतर शहाजी पाटील यांनी पत्नी राजश्री यांच्या नावावर तीन लाख 80 हजार रुपये कर्ज काढून, ती रक्कम लोंढे याच्या बॅंक खात्यावर पाठवली. त्याही रकमेचा चेक लोखंडेने पाटील यांना दिला. या रकमेचे चार ते पाच हप्ते, पाच टक्के व्याजाने शहाजी पाटील यांच्या बॅंक खात्यावर जमा केले. मात्र, ऑक्टोबर 2022 पासून पाटील यांना गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळणे बंद झाले. परतावा मिळत नसल्याबाबत पाटील यांनी तिघांकडे विचारणा केली असता, सध्या मार्केट डाऊन असल्याने नंतर पैसे मिळतील, सहा महिने थांबा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर एकदा शहाजी पाटील यांनी मलकापूर येथे ऑफिसमध्ये जाऊन संबंधितांची भेट घेतली.
त्यावेळीही त्यांनी काळजी करू नका, परतावा मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानंतरही पाटील यांना परतावा न मिळाल्याने ते जानेवारी महिन्यात चेक वटवण्यासाठी बॅंकेत गेले. त्यावेळी लोंढे याच्या बॅंक खात्यात पैसे नसल्याचे त्यांना समजले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
दरम्यानच्या काळात, बहे-तांबवे येथील विश्वास निवृत्ती मोहिते (तीन लाख दहा हजार), मालोजी तातोबा सरगर (20 हजार), वसंतराव रामचंद्र देशमुख (दोन लाख दहा हजार), वाठार, ता. कराड येथील विनायक शिवाजी तोडकर (पाच लाख दहा हजार), अक्षयकुमार बाळासाहेब पाटील (14 लाख दहा हजार), अमोल आनंदराव देसाई (12 लाख) व सुयश उल्हास देसाई (एक लाख), कार्वे नाका, कराड येथील शैलेश परशुराम चव्हाण यांच्यासह अन्य काही लोकांची संबंधितांनी फसवणूक केल्याचे, त्यांच्याकडून समजले, असे शहाजी पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ
या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. पोलीस उपनिरीक्षक दळवी यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मी बाहेरगावी आहे. कार्यक्रम असल्याने दोन दिवस येणार नाही. आल्यानंतर भेटू. रविवारी येणार आहे. नाइट ड्युटी केली आहे. सायंकाळी पाच वाजता भेटू. दिवसभर न्यायालयात होतो, अशी कारणे सांगून त्यांनीही टोलवाटोलवी केली. फसवणुकीचा आकडा मोठा असताना, त्याची माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ का केली, याचे गौडबंगाल समजू शकले नाही.





